सलामी फलंदाजांना बाद न करताच जिंकला सामना, हे कसे काय?

Match won without dismissing opening batsmen

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या दोन्ही सलामी फलंदाजांनाही बाद न करता एखादा संघ सामना जिंकू शकतो का? दोन्ही सलामी फलंदाज नाबाद राहिले तरी एखादा संघ ऑल आऊट होऊ शकतो का? हे कसे शक्य आहे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे आणि असे होऊ शकत नाही असे उत्तरही येणे अपेक्षितच आहे पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त एकदाच असे घडलेय आणि पाकिस्तानने तो वन डे सामना जिंकलाय. म्हणजे प्रतिस्पर्धी संघांच्या सलामी फलंदाजांना बाद न करता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना जिंकणारा पाकिस्तान हा एकमेव संघ आहे. पण हे झाले कसे?

तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 28 मार्च 2000 पर्यंत मागे जावे लागेल. शारजातील कोका कोला कपचा तो सामना पाकिस्तान विरुध्द दक्षिण आफ्रिका होता. त्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 168 धावा केल्या आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ 26.5 षटकात 101 धावांमध्ये ऑल आऊट झाला, मात्र या डावात त्याचे दोन्ही सलामी फलंदाज,गॅरी कर्स्टन व हर्षल गिब्ज हे बाद झालेले नव्हते.

हे कसे काय? तर सलामीला आलेला हर्षल गिब्ज दक्षिण आफ्रिकेचा डाव आटोपला तरी 79 चेंडूत 59 धावा करुन नाबाद परतला. हे ठीक आहे…संघ ऑल आऊट झाला तरी एक फलंदाज नाबादच परततो पण दुसरा सलामी फलंदाज गॅरी कर्स्टनचे काय? तो बाद झाल्याशिवाय पूर्ण संघ बादच कसा होऊ शकतो?

तर त्याचे झाले असे की, गॅरी कर्स्टन प्रचंड पाठदुखीमुळे खेळणे अशक्य झाल्याने 19 चेंडूत 8 धावा केल्यावर निवृत्त (रिटायर हर्ट) झाला होता. याप्रकारे दक्षिण आफ्रिकेचे सालामी फलंदाज गॕरी कर्स्टन हा रिटायर हर्ट आणि हर्षल गिब्ज नाबाद असतांनाही पाकिस्तानने तो सामना 67 धावांनी जिंकला होता आणि या प्रकारची आगळी वेगळी नोंद असलेला वन डे इंटरनॅशनल क्रिकेटच्या इतिहासातील हा एकमेव सामना आहे.