पुरुषत्व ! नव्हे, एक आपत्ती ?

household chores'

लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात मुंबईतील सुवर्णा घोष (Suvarna Ghosh) यांनी एक आगळीवेगळी ऑनलाईन याचिका दाखल केली. त्यांनी पंतप्रधानांजवळ हिंदी कवितेतून आपली ‘मन की बात’ (Mann Ki Baat) सांगत प्रश्न केला- “लॉकडाऊन में  फिर काम क्यू बढता? भागीदारी ही हैं जिम्मेदारी, क्या बराबरी नहीं  इंडिया को प्यारी?”  यातून ‘समस्त स्त्रीजातीची मन की बात’ त्यांनी व्यक्त केली . खरे तर अगदी पूर्वी म्हणजे इ. स. पूर्व २०० ते १२७१ म्हणजे सातवाहनापासून यादवापर्यंत अनेक राजघराण्यांनी धर्मराज्ये केली आणि आपल्या राजकर्तव्याचे माप महाराष्ट्राच्या पदरात भरपूर ओतले. सर्वत्र संपन्नता होती. पोरेबाळे, लेकीसुना, शेतीभाती, गुरेवासरे ,पशुपक्षी एवढेच काय झाडे-झुडपेसुद्धा आनंदात होती. विविध कला, काव्य यांनाही पूर आला होता अन् घात झाला! विंध्याचल पर्वतामागून अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण झाले. राजा शंकर देवाने प्रयत्न करूनही विजय हाती येता-येता हरवला. सम्राट यादवांची देवगिरी द्रौपदीसारखी गेली. अल्लाउद्दीनने मलिक काफुरला खास हुकूम केला होता- “सैनिकों के अपराध होम पर तथा अपहरण पर कोई भी ध्यान न देना !” आणि वैऱ्यांच्या कामाग्नीत दररोज नवीन समिधा पडू लागल्या. तारुण्य व सौंदर्य हे महाराष्ट्राच्या लेकीसुनांचे अपराध ठरावेत का?

हे तर झाले केवळ एक उदाहरण; पण कोणतीही नैसर्गिक आपत्ती (Natural disasters) , युद्ध वा साथरोगांसारखी महामारी यात नेहमीच महिलाच होरपळत असताना दिसतात. लिंगभावानुसार पुरुषांमध्ये संस्कारित केलेला पुरुषत्वाचा सत्तामदांधपणा सगळीकडे जाणवतो. श्रमविभागणीत घरातील कामे दुय्यम व विनापगारी म्हणून गौण समजली जातात. भावनांचेसुद्धा वर्गीकरण रुजत गेलेले दिसते. त्यामुळे कुठल्याही संकटात आपत्तीमध्ये घर सोडून गेलेली, हिंसाचार करणारी, लैंगिक समाधानासाठी संघर्ष करणारी स्त्री ऐकिवात फारशी नाही.

मुघल साम्राज्यातील आक्रमणे काय किंवा नंतरही पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी काय, जर्मनीने पोलंड, हंगेरी, रशियावर केलेली आक्रमणे असोत आणि नंतर १९४५-४६ ला रशियाने जर्मनीवर केलेली आक्रमणे असू देत, यात सदैव स्त्रियांवर अत्याचार होतच राहिले. सत्ता कोणाचीही असो, नाझी काय किंवा कम्युनिस्ट काय, स्त्री ही अक्षरशः फक्त मालमत्ता स्वरूपातच विचारात घेतली गेली. याला फक्त या बाबतीत मात्र इंग्रज सत्ता अपवाद ठरली. भारताला दीर्घकाळ पारतंत्र्य ठेवून व अन्याय करून शृंखलेत जखडले. मात्र स्त्रियांवर म्हणून अत्याचार केलेले आढळत नाहीत. उलट शिक्षणाच्या प्रसाराने नवीन विचारांचे वारे पुरुषांच्या मनावरून वाहू लागले. काही प्रमाणात स्त्रीशिक्षणाला प्रोत्साहन मिळत गेले. अगदी अलीकडील एक उदाहरण म्हणजे सोमालियातील संघर्षाची परिस्थिती . ह्यूमन राइट्स वोचच्या म्हणण्यानुसार सोमालयातील अंतर्गत विस्थापित लोक मोगा- दिशुच्या निर्वासित छावण्यांमध्ये सामूहिक बलात्कार आणि इतर अत्याचाराच्या प्रकारात लैंगिक हिंसाचार सहन करत आहेत. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या २३ वर्षीय महिलेवर सैन्याच्या गणवेशात तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. आफ्रिकन वुमन अँड चाइल्ड फीचर सर्व्हिसच्या  ज्येष्ठ संपादक झेन गोदिया म्हणतात, “संघर्षाच्या परिस्थितीत बरेचदा दोन्ही पक्ष युद्धाची युक्ती म्हणून पद्धतशीर बलात्काराचा वापर करतात.” या अत्याचारापासून वाचलेल्या स्त्रियांना बलात्कार, युद्ध आणि मृत्यूच्या ज्वलंत आणि भयानक प्रतिमेसह आयुष्य जगावं लागतं. त्यामुळे त्या ‘पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डीसोर्डर’ला बळी पडतात. तसेच लैंगिक आजार, कलंक आणि कधी कधी अवांछित गर्भधारणा सहन करीत राहतात. विस्थापित कुटुंबे एकत्र ठेवणे, पायाभूत सुविधांचा नाश, अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून देणे यासाठी कठीण काम करीत राहतात.

नैसर्गिक आपत्तींचादेखील पुरुष व स्त्रियांवर प्रभाव पडतो तो अस्तित्वात असलेल्या लैंगिक असमानतेमुळे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक  यांच्या २००७ च्या अभ्यासानुसार १९८१ ते २००७ या कालावधीत १४१ देशांतील नमुन्यावर अभ्यास केला गेला. नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतरचे दुष्परिणाम यामध्ये, सरासरी पुरुषांपेक्षा स्त्रियांचे मृत्यूचे प्रमाण आणि त्यांची तुलनात्मक मृत्यूची वये पुरुषांपेक्षा कमी होती. यामागे त्यांची सामाजिक व आर्थिक निम्न पातळी व परावलंबित्व कारणीभूत आहे. आपत्तीशी संबंधित धोके साधारणपणे उपलब्ध साधनसामग्रीवर अवलंबून असतात; पण मुळातच स्त्रियांकडे शारीरिक, आर्थिक, मानवी संसाधने, सामाजिक आणि नैसर्गिक संसाधने, निर्णय परावलंबित्व, तांत्रिक कौशल्यांची उपलब्धता कमी असते. खरे तर हे धोके टाळण्यासाठी स्त्रियांना सक्षम करणे, विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. खरे बघता त्यांच्या स्त्रीत्वाची वैशिष्ट्ये अशी उपयुक्त आहेत की, धोक्याची पूर्वसूचना लवकर मिळते, लोकांशी जास्त संबंधित राहण्याचा कल, समाजाचे सखोल ज्ञान, नैसर्गिक संसाधनांची जपणूक करण्याची प्रवृत्ती आणि काळजी घेण्याची वृत्ती त्यामुळे त्या जास्त चांगल्या प्रकारे नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना व त्याच्यातून योग्य प्रकारे बाहेर पडण्यासाठी उपयोगी त्यांचे कसब वापरू शकतात. उदाहरणार्थ, होन्डुरासमध्ये मेसीका हे गाव १९९८ ला चक्रीवादळ ‘मीच’च्या या पार्श्वभूमीवर मृत्यूची एकही नोंद न करणारे एकमेव ठरले आहे. याला कारण तेथे स्त्रियांनी सतत धोक्याची पूर्वसूचना देण्याचे मोठे ध्येय समोर ठेवून निरीक्षण सुरू ठेवले होते. अर्थातच वादळाची पूर्वसूचना मिळाल्याने आवश्यक हालचालीही सोप्या झाल्या.

या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोनानेही आपली तीच काळी मोहोर उमटवली. मार्चपासूनच्या अचानक आलेल्या या लॉकडाऊनने चिंता, तणाव, भीतीला सामोरे जातानाच पुरुषांपेक्षा अधिक ताण स्त्रियांना सहन करावा  लागला. लैंगिक शोषणालाही त्यांना बळी जावे लागते आहे.  भारताबरोबरच जगभरात अशा घटना घडत असून मुळाशी असणाऱ्या पुरुषत्व या संकल्पनेचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ प्रत्येक राष्ट्रावर आली आहे. नोकरी व्यवसायातील अस्थिरता, बेरोजगारी, आर्थिक चिंता, व्यसनांवर असणारे निर्बंध आणि रिकामा वेळ याचा निचरा महिलांवर हिंसाचाराच्या रूपाने राग काढून केला जातो. घरातील मदत करणाऱ्या कामवाल्यांची  उपस्थिती नसल्याने महिलांवरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. काही प्रमाणात अपवाद वगळता पुरुषांनी घरकामाची जबाबदारी वाटून घेतलेली दिसत नाही .वारंवार शारीरिक संबंधांची मागणी, गर्भधारणा प्रतिबंधकाचा तुटवडा, अनियोजित गर्भधारणा यांनी महिला त्रासल्या आहेत. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचे हाल तर विचारायलाच नको. याव्यतिरिक्त स्थलांतरित व्हावे लागणाऱ्या महिलांना तर मैलोनमैल उन्हातान्हातून ओझे घेऊन चालणे, स्वच्छतेच्या सोयींची अनुपलब्धता, पाळीच्या काळातील हाल तर वेगळेच सहन करावे लागतात आहे आणि अशा ताणातील परिस्थितीतदेखील आपल्यावर आर्थिक व भावनिकदृष्ट्या अवलंबून असणाऱ्या व्यक्तींवर पुरुष आपला ताण काढत आहे. हा ताण त्यांनी बाहेर पोलिसांवर का नाही काढला? ही स्थिती विचार करण्यासारखी आहे. इंग्लंड, फ्रान्स, टर्की, इंडोनेशिया सगळ्या देशांचे चित्र सारखेच आहे. ‘कोरोना विरुद्धच्या लढाईइतकेच हिंसाचारपीडित स्त्रियांच्या संरक्षणाला महत्त्व द्या’ असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिया गुटेरेस यांनी जगभरातील शासनकर्त्यांना केले.

केवळ सत्ता आणि सत्ताहीनता या रचनेमुळे स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात उतरत नाही. ते बीज संस्कारातून अजूनही असेच पेरले जाते .जीवनसाथी बरोबर २४ तासही घरात राहू न शकणे हे आपल्या समाजव्यवस्थेचे मोठे अपयश आहे. आता तरी केवळ माणुसकीशी फारकत घेणारे, पुरुषत्वाचे विकृत संस्कार करू नयेत हीच अपेक्षा आहे आणि हाच मार्गही आहे !
मानसी फडके

एम. ए. (मानसशास्त्र),
एम. एस. (समुपदेशन आणि सायको थेरपी),
एम. ए. (मराठी)

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER