भारतीयाशी लग्न केल्याने नागरिकत्व मिळत नाही

citizenship - Patna High Court

पाटणा :- एखाद्या परकीय व्यक्तीने भारतीय नागरिकाशी विवाह करून ती भारतात राहू लागली तरी तेवढ्यानेच ती आपोआप भारतीय नागरिक होत नाही, असे पाटणा उच्च न्यायालयाने (Patna High Court) म्हटले आहे.

तसेच अशा परकीय व्यक्तीने विवाहानंतर मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि पॅनकार्ड यासारखे दस्तावेज मिळविले असले व तिने येथील बँकेत खाते उघडले असले तरी या गोष्टींवरून तिचे भारतीय नागरिकत्व सिद्ध होत नाही. कारण हे दस्तावेज संबंधित  व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे निर्विवाद पुरावे नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

किरण या नेपाळमध्ये जन्मलेल्या व तेथेच लहानाची मोठी झालेल्या एका महिलेने सन २००३ मध्ये बिहारमध्ये येऊन अशोक प्रसाद गुप्ता यांच्याशी विवाह केला. तेव्हापासून ती बिहारमध्येच रहात आहे. दोन वर्षांपूर्वी ती जेथे राहते त्या गावाची सरपंच म्हणून निवडून आली. परंतु ती भारतीय नागरिक नाही, या मुद्द्यावर राज्य निवडणूक आयोगाने तिची निवड रद्द केली. याविरुद्ध किरणने केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्या. संजय करोल व न्या. एस. कुमार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

खंडपीठाने म्हटले की, संसदेने नागरिकत्व कायदा केला आहे व त्यात मुळात बारतीय नागरिक नसलेल्या भारताचे नागरिकत्व कसे व केव्हा मिळू शकते याच्या स्पष्ट तरतुदी आहेत. भारतीय नागरिकाशी विवाह करून एखादी व्यक्ती अनेक वर्ष भारतात राहिली म्हणून तिला आपोआप भारतीय नागरिकत्व मिळण्याची त्यात कुठेही तरतूद नाही. अशा व्यक्तीलाही नागरिकत्वासाठी रीतसर अर्ज करावा लागेल व तो नियमात बसत असेल तर नागरिकत्व मिळू शकेल.

न्यायालयाने म्हटले की, किरण हिच्याकडे मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड इत्यादी असले तरी त्याचा ती भारतीय नागरिक असण्याशी काही संबंध नाही. पॅनकार्ड हे प्राप्तिकर सुलभपणे भरता यावा यासाठी असते व ते परकीय नागरिकांनाही दिले जाते. तसेच भारतात सहा महिने किंवा त्याहून अधिक वास्तव्य केलेली परकीय व्यक्तीही आधारकार्ड घेऊ शकते. त्यामुळे या गोष्टी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे ठोस पुरावे असू शकत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER