कोल्हापुरात लागले खड्ड्यांचे लग्न

marriage of potholes in Kolhapur

कोल्हापूर :रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दखल महापालिका प्रशासन घेत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना शहर शाखेच्यावतीने अनोख्या पद्धतीने रविवारी आंदोलन केले. शिवाजी पेठ येथील शिवाजी मंदिराजवळ रस्त्यावरील खड्ड्यांचेच लग्न लावले. मंगलाष्टका, रांगोळी आणि गोडधोड अशा अनोख्या वातावरणात प्रशासनाचा निषेध करण्यात आला. सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी रस्त्यासाठी निधी देत नसल्याचा आरोप नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांनी केला.

शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत गल्लीतील रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. शिवाजी मंदिर ते सरदार तालमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अशीच अवस्था झाली आहे. विरोधी आघाडीच्या नगरसेविका असल्याने रस्ता दुरुस्तीसाठी निधी दिला जात नसल्याचा आरोप करत शहर प्रमख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले.

खड्ड्यांसोभवती रांगोळी घालण्यात आली होती. मंगलाष्टका म्हणत विधीवत पुजाऱ्यांच्या हस्ते खड्ड्यांसोबत प्रशासनाचा निषेधात्मक विवाह घडवून आणला. नगरसेविका इंगवले म्हणाल्या, ‘नवीन रस्ता करण्यासाठी १५ लाखांचा निधी आवश्यक आहे. मात्र विरोधी आघाडीची नगरसेविका असल्याने निधी देण्यास विलंब केला जात आहे. प्रशासन व विरोधी आघाडीला जाग आणण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन केले.’ यावेळी तात्या साळोखे, सागर शिपेकर, बाळासाहेब भोसले, उमेश जाधव, मंगेश इंगवले, राजाभाऊ घोरपडे, उदय माने आदी उपस्थित होते.