मेडिकल प्रवेशासाठी फक्त ‘नीट’ परिक्षेतील गुण एवढाच निकष नाही

Nagpur High Court - NEET Exam
  • हायकोर्ट: इयत्ता १२ वीत किमान ‘पीसीबी’ गुणही हवेत

नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ‘नीट’ परिक्षेत मिळालेले गुण एवढाच निकष नाही. संबंधित उमेदवाराला ज्या प्रवर्गातील जागेवर प्रवेश घ्यायचा असेल त्या प्रवर्गासाठी ठरलेले इयत्ता १२ वी च्या परिक्षेत पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (PCB) या विषयसमुहात त्याला किमान आवश्यक गुणही मिळालेले असायला हवेत, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, मुळात राखीव प्रवर्गातील जागेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराला नंतर सर्वसाधारण प्रवर्गातील (General Category) जागेसाठीही स्थलांतर करता येऊ शकते. मात्र त्यासाठी त्याला ‘पीसीबी’मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ठरलेले किमान गुण मिळालेले असायला हवेत. त्याला तेवढे किमान गुण नसतील. पण त्याची ‘नीट’मधील गुणवत्ता इतरांहून श्रेष्ठ असली तरी असा उमेदवार अशास्थलांतरित जागेवरील प्रवेशासाठी पात्र ठरत नाही.

‘बीएएमएस’ या आयुर्वेद शाखेतप्रवेश घेऊ इच्छिणारी हनुमान नगर, नागपूर येथील  वंशिका राजेश हरिणखेडे या विद्यार्थिनीने केलेली याचिका फेटाळताना न्या. सुनील शुक्रे व न्या. अविनाश घारोटे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

वैद्यकीय प्रवेशांच्या नियमांनुसार ‘नीट’ परिक्षेतील उत्तीर्णतेखेरीज सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारास ‘पीसीबी’मध्ये किमान ५० टक्के (३०० पैकी १५०) व राखीव प्रवर्गातील उमेदवारास किमान ४० टक्के (३०० पैकी १२०) गुण मिळणे ही किमान आवश्यक पात्रता ठरलेली आहे. वंशिका हिने ‘ओबीसी’ प्रवर्गातील जागेसाठी अर्ज केला होता. नीट’ परिक्षेत तिला ४०० पैकी २९६ गुण मिळाले होते तर इयता १२ वीत तिला ‘पीसीबी’मध्ये २०० पैकी १४२ गुण होते. अशा प्रकारे ती ‘ओबीसी’ प्रवर्गातील प्रवेशासाठी पात्र होती.

वंशिकाला सन्मार्ग शिक्षण संस्थेतर्फे  चालविल्या जाणाºया भिलेवाडा, भंजारा येथील शालिनीताई मेघे आयुवर्दिक मेडिकल कॉलेजात ‘बीएएमएस’ला प्रवेश घ्यायचा होता. जानेवारीमध्ये कॉलेज पातळीवरील प्रवेशांची पहिली फेरी झाली तेव्हा तिला तिच्या ‘नीट’मधील गुणांच्या आधारे ‘ओबीसी’ कोट्यातून प्रवेश मिळू शकला नाही.

या पहिल्या फेरीनंतर राखीव प्रवर्गातील प्रवेशाच्या सर्व जागा भरल्या गेल्या. परंतु सर्वसाधारण प्रवर्गातील काही जागा शिल्लक होत्या. त्यापैकी एका जागेवर तिला ‘नीट’च्या गुणांच्या आधारे प्रवेश मिळू शकत होता. म्हणून तिला तो प्रवेश घेण्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन २० मार्च रोजी बोलावले गेले. पण निरीक्षकाने घेतलेल्या आक्षेपामुळे तिला प्रवेश दिला गेला नाही. वंशिका सर्वसाधारण प्रवर्गातील जागेवर प्रवेश घेत असल्याने नियमानुसार तिला इयत्ता १२ वीत ‘पीसीबी’मध्ये किमान १५० गुण मिळालेले असायला हवे होते. पण तिला फक्त १४२ गुण असल्याने ती प्रवेशास पात्र नाही, असा तो आक्षेप होता.

यायच मुद्द्यावर तिने उच्च न्यायालयात याचिका केली. तिचे म्हणणे असे होते की,  प्रत्यक्ष प्रवेश देताना ‘पीसीबी’मधील गुणांच्या आधारे पात्रता गैरलागू ठरते व फक्त नीट’मधील गुणांच्या आधारेच प्रवेश द्यायला हवा होता. सर्वसाधारण प्रवर्गातील शेवटचा प्रवेश घेणाºया उमेदवारास ‘नीट‘मध्ये फक्त २८५ गुण मिळालेलेले होते. वंशिकाचे ‘नीट’मधील २९६ हे गुण त्याच्याहून जास्त होते. त्यामुळे तिला त्याआधारे प्रवेश द्यायला हवा होता.

परंतु हे म्हणणे अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, वंशिकाने ‘ओबीसी’ प्रवर्गात प्रवेशासाठी तिची पात्रता आधीच सिद्ध झाली होती. तिला त्या प्रवर्गात प्रवेश मिळाला असता तर प्रश्नच नव्हता. परंतु तेथे प्रवेश न मिळाल्याने तिने राखीव प्रवर्गातून सर्वसाधारण प्रवर्गात स्थलांतर केले. अशा स्थलांतरास पात्र ठरण्यासाठी तिला त्या प्रवर्गासाठी नियमानुसार ठरलेले ‘पीसीबी’मधील किमान गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. कारण ‘नीट’मधील गुण फक्त एखाद्या प्रवर्गातील उमेदवारांची आपसातील गुणवत्ता ठरविण्यासाठी वापरले जायचे असतात.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button