दिल्लीतील मरकज येथून नागपुरात आलेला ३२ वर्षीय युवक कोरोनाबाधित

markaaz-member-from-nagpur-tests-positive-for-covid-19

नागपूर : दिल्लीतील मरकज येथून नागपुरात आलेला ३२ वर्षीय युवक कोरोनाबाधित असल्याचा अहवाल पुढे आल्यामुळे नागपूर प्रशासन घाबरले आहे. गेल्या चार दिवसांत शहरात एकही कोरोनाबाधित आढळला नाही. पण मरकजहून आलेल्या युवकाने कोरोनाची खंडित झालेली साखळी पुन्हा जोडली. हा युवक मध्य नागपुरातील असून हा परिसर ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. कोरोनाबाधित असल्याचा अहवाल येताच त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवण्यात आले. उपराजधानीतील कोरोनाबाधिताचा आकडा आता १७ वर पोहचला आहे.

दिल्ली येथून परत आल्यानंतर वनामती येथील विलगीकरण कक्षात त्या कोरोनाबाधिताला ठेवण्यात आले होते. त्याचे मेयोत नमुने पाठवण्यात आले होते; परंतु येथील एक यंत्र बंद पडल्याने नमुने तपासणीला उशीर झाला. मात्र एम्समध्ये आज नमुने तपासणीत हा युवक कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. हा दिल्लीतील निजामुद्दीनच्या मरकज येथे धार्मिक कार्यासाठी गेला होता. १४ मार्चच्या सुमारास रेल्वेने नागपुरात परत आला होता. सुरुवातीला कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसली असून साथ आजाराचे औषध घेत होता. जिल्हा प्रशासनाला मरकजहून नागपुरात परत आलेल्यांची यादी मिळताच पोलिसांच्या मदतीने त्याला विलगीकरणात घेतले गेले.

६३९ व्यक्ती विलगीकरणात

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विभागात संशयित व बाधित नागरिकांची प्रत्येक स्तरावर तपासणी होत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी शहरातील चौघे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी झाली आहे. ४ एप्रिलच्या सकाळपर्यंत आमदार निवास, रविभवन व वनामती येथे एकूण ६३९ जण विलगीकरणात आहेत. विलगीकरणात असलेल्यांत निजामुद्दीनहून आलेल्या ४०७ जणांचा समावेश आहे. पैकी १२७ व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. या सगळ्यांना दैनंदिन वापराच्या वस्तूंची कीट तसेच वायफाय आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यासोबत वैद्यकीय तपासणी, भोजन, चहा-नाश्‍ता तसेच विविध पुस्तके, वर्तमानपत्रे आदी सुविधा दिली जात असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

कोरोनासाठी १०० खाटा

कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) प्रयोगशाळा तयार झाली. यासोबतच एम्समध्ये १०० खाटांचा आयसोलेशन कक्ष उभारण्यात आला आहे. संशयित कोरोनाच्या रुग्णांच्या तपासणीसाठी कोरोना कॉर्नर सुरू आहे. एम्समध्ये १०० खाटांचे स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करून कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. एम्समध्ये मास्क, व्हेंटिलेटरसह इतरही अत्यावश्‍यक वस्तू तातडीने खरेदी करण्यात आल्या आहेत.

चार दिवसांनंतर पॉझिटिव्ह शहरात ३१ मार्चनंतर ३ एप्रिलपर्यंत असे चार दिवस एकही कोरोनाबाधित आढळला नाही. ही मनाला दिलासा देणारी बाब होती. मात्र मेयो आणि मेडिकलमध्ये कोरोना संशयितांचा आकडा कमी होत नाही. मेयो-मेडिकलमध्ये ५० पेक्षा अधिक संशयित दाखल आहेत. त्यात दिल्ली येथील मरकज येथून नागपुरात आलेल्या ५०पेक्षा अधिक व्यक्तींना विलगीकरण कक्षात आणले आहे. बुधवारी रात्री हे नमुने तपासणीसाठी मेयोत पाठवले आहेत. नागपुरात ११ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित आढळून आला. यानंतर उपराजधानीत कोरोनाची दहशत पसरली. हा आकडा १६ वर पाच दिवस थांबला. परंतु दिल्लीतील मरकजमधून आलेल्या व्यक्तीने कोरोनाची खंडित झालेली साखळी पुन्हा जोडली व नागपुरात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ वर पोहचला आहे.