मारिया शारापोव्हाची निवृत्ती

maria sharapova

मियामी : पाच वेळची ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेती मारिया शारापोव्हा हिने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या लेखामधून तिने हा निर्णय जाहीर केला आहे. मारिया सध्या ३२ वर्षांची असून तिने २०१४ पासून एकही ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकलेले नाही. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती पहिल्याच फेरीत बाद झाली होती.

कोहलीने गमावले अव्वल स्थान

मारियाने आपल्या लेखात ‘गुडबाय टेनिस’ असे म्हटले आहे. तिने म्हटले आहे की, आयुष्य टेनिसला समर्पित करताना टेनिसनेही मला आयुष्य दिले. माझ्या पुढील वाटचालीत टेनिसची कमतरता मला नेहमीच जाणवेल. दररोजचा सराव आणि प्रशिक्षणाची मला आठवण येत राहिल. दररोज सकाळी उठल्यानंतर डाव्या बुटाच्याच लेस आधी बांधायच्या आणि पहिला चेंडू खेळायच्या आधी टेनिस कोर्टचा दरवाजा बंद करायचा हे आता बंद होईल. माझे सहकारी, माझे प्रशिक्षक, वडिलांसोबत सरावाच्या कोर्टच्या बाजूच्या बाकावर बसायचे हे सर्वच आता आठवणीत राहीेल. जिंको वा हारो, त्यानंतरचे हस्तांदोलनही होणार नाही.

मुळची रशियन असलेली मारिया १९९४ मध्ये फक्त सात वर्षे वयाची असताना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे टेनिसच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी स्थलांतरीत झाली. त्यानंतर २००४ मध्ये फक्त १७ वर्षे वयातच तिने विम्बल्डन स्पर्धा जिंकली. २००५ मध्ये ती क्रमवारीत सर्वोच्च स्थानी पोहोचली. विम्बल्डनसह तिने दोन वेळा फ्रेंच ओपन आणि प्रत्येकी एकदा युएस व ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१६ मध्ये ती प्रतिबंधीत द्रव सेवन प्रकरणी दोषी ठरली होती त्याप्रकरणात तिला १५ महिने बंदीला सामोरे जावे लागले होते. २०१७ मध्ये पुनरागमनानंतर ती पूर्वीसारखे यश मिळवू शकली नव्हती.