मार्डचे डॉक्टर ‘कृष्णकुंज’वर; राज ठाकरेंकडून मदतीचे आश्वासन

मुंबई : सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या (Corona) मोठ्या संकटाशी सामना करत आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील निवासी डॉक्टर्स जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र तरीही या डॉक्टरांना अद्याप वेतनवाढ मिळालेली नाही. याशिवाय त्यांच्या विद्यावेतनावर करही लावला जातो. यांसह इतर सर्व मागण्यांचे निवेदन घेऊन मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळांनी आज कृष्णकुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर लवकरच राज ठाकरे (Raj Thackeray) हे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यापुढे हे सर्व विषय मांडणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आज मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळांची बैठक आयोजित केली होती. या वेळी मागील ११ महिन्यांतील थकीत वेतनवाढ झालेले वेतन आम्हाला अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे हे वेतन त्वरित मिळावे, अशी प्रमुख मागणी या डॉक्टरांनी राज ठाकरेंसमोर मांडली. या मागणीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला.

कोरोनाकाळात मुंबईत निवासी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मुंबईत एकूण तीन हजार मार्ड डॉक्टर आहेत. पण तरीही त्या डॉक्टरांना वेतनवाढीतील वेतन मिळालेलं नाही. याशिवाय विद्यावेतनावर टॅक्सही कापला जातो. याशिवाय वर्षभर इतर सर्व वैद्यकीय शिक्षण बंद असताना वर्षभराची संपूर्ण फीदेखील आकारली आहे. जर येत्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही उपोषण करू. आम्हाला न्याय मिळावा या उद्देशाने आम्ही राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी आम्हाला या संदर्भात न्याय मिळेल असं आश्वासन दिलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन करतो आहे. कोरोना रुग्णांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत, अशी माहितीही डॉक्टरांनी यावेळी दिली.

एकीकडे आपण डॉक्टरांना देवदूत मानतो. मात्र त्यांच्यावर आता ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी वेळ आली आहे. कोरोनाकाळात दिवसरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सरकारने वाढवलेले मानधन द्यावे. १० हजार ही रक्कम महानगरपालिकेसाठी छोटी असली तरी डॉक्टरांसाठी मोठी आहे.

तसेच राज्यभरात डॉक्टरांचा टीडीस कापला जात नाही तर मग महानगरपालिका निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात टीडीएस का कापत आहे, असा प्रश्न मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला. तसेच लवकरच राज ठाकरे हे राजेश टोपे यांची वेळ घेऊन त्यांच्यापुढे हा विषय मांडतील, अशी माहितीही नांदगावकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button