पदवीधर निवडणुकीसाठी मराठवाड्यातील भाजपच्या दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच

Praveen Ghuge & Shirish Boralkar

औरंगाबाद : राज्यातील तीन पदवीधर आणि दोन  शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला. १ डिसेंबरला त्यासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्येच खरी चुरस बघायला असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मेष्टा संघटना आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा   आहे.

दरम्यान उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधील नेत्यांमध्ये रस्सीखेच  आहे. भाजपचे शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) आणि प्रवीण घुगे (Praveen Ghuge) यांच्यात आधीपासूनच रस्सीखेच सुरू होती. त्यात आता माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनीही या स्पर्धेत उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपकडून पदवीधरचे तिकीट कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी तीनही नेत्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातही झाली आहे.

दुसऱ्या बाजूला औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण हे सलग तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात ‘सहविचार सभा’ घेण्यासही सुरुवात केली आहे. तर भाजपकडून शिरीष बोराळकर यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. बोराळकर यांचा गेल्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी पराभव केला होता. त्यामुळे बोराळकर आता अधिक आक्रमकपणे कामाला लागले आहेत.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप उमेदवारात होणार आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश इंगे मैदानात उतरणार असल्याची माहिती पुढे येत आहे. तर मेष्टा संघटनेकडून संजय तायडे निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसने आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER