
शिर्डी : दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंबर कसली आहे. शिर्डीत भाविकांची गर्दी आटोक्यात आणावी, तसेच नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, यासाठी कोरोना टास्क फोर्सची बैठक घेतली.
प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्केसह साईबाबा संस्थानचे अधिकारी, परिवहन, रेल्वे आणि शिर्डी विमानतळाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, तसेच भाविक आणि नागरिकांसाठी काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत.
शिर्डीत दर्शनाला होणारी गर्दी, आठवडे बाजार, दुकाने, लग्न, मेळावे अशा ठिकाणी नागरिक निर्धास्तपणे वागताना दिसत आहेत. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचा आणि मास्क वापरण्याचा विसर पडला आहे. या बैठकीत सर्व विभागांना नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. तसेच विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची तपासणी करणे आणि लक्षणे आढळल्यास प्रथम उपचार करणे, अशा सूचना प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिल्या.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील नागरिकांना आवाहन केले आहे. नागरिकांनी काळजी घेतली नाही, तर पुन्हा राज्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला