सर्वात कमी धावसंख्यात सर्वाधिक धावा कुणाच्या?

Mayank Agrawal

अॕडिलेड कसोटीत आॕस्ट्रेलियाने आज भारताला फक्त 36 धावातच गुंडाळले. भारताचा एकही फलंदाज दोन आकडी धावा करु शकला नाही. मयंक अगरवालच्या 9 धावा ही भारतीय फलंदाजांतर्फे सर्वोच्च खेळी ठरली.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच असे घडले आहे की एखादा संघ सर्वबाद झालेला असताना एकही फलंदाज 10 सुध्दा धावा करू शकला नाही. अगदी न्यूझीलंडचा संघ सर्वात कमी 26 धावात बाद झाला तेंव्हासुध्दा असे घडले नव्हते.

कसोटी सामन्यांमध्ये 40 पेक्षा कमी धावात जेंव्हा संघ बाद झाले त्या डावांमधील सर्वोच्च खेळी कोणत्या हे बघू या..

26- न्यूझीलंड वि. इंग्लंड, आॕकलंड, 1955

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात सलामीवीर बर्ट सटक्लिफ हे एकटेच दोन आकडी धावा करणारे होते. त्यांनी 11 धावा केल्या होत्या, या डावात पाच किवी फलंदाज शून्यावर तर तीन जण फक्त एका धावेवर बाद झाले होते.

30- दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड, पोर्ट एलिझाबेथ 1896

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील 30 धावात राॕबर्ट पूर यांच्या 10 धावा होत्या. चार फलंदाज शून्यावर बाद झाले होते.

30- दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड, बर्मिंगहॕम, 1924

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकन संघ 30 धावात बाद झाला त्यात एकही फलंदाज दोन आकडी धावा करु शकला नाही. फलंदाजात सलामीच्या हर्बी टेलरच्या 7 धावा सर्वाधिक राहिल्या. पण सर्वाधिक योगदान अवांतरच्या 11 धावांचे राहिले. या डावाप्रमाणेच आता भारताच्या डावातही एकही फलंदाज 10 धावा करु शकला नाही पण भारताच्या 36 धावात अवांतर धाव एकही नाही. दक्षिण आफ्रिकेचे चार फलंदाज शून्य धावांवर बाद झाले.

35- दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड, केपटाऊन, 1899

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात उडालेल्या घसरगुंडीत सलामीच्या अल्बर्ट पाॕवेलने 11 धावा केल्या. तीन फलंदाज शून्यावर बाद झाले.

36- दक्षिण आफ्रिका वि. आॕस्ट्रेलिया, मेलबोर्न, 1932

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात सहाव्या क्रमांकाचा फलंदाज जॕक कॕमेराॕनने 11 धावा केल्या. इतर सर्व एकेरी धावात परतले. तीन जणांना खाते खोलता आले नाही. दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकन संघ फक्त 45 धावात बाद झाला.

36- आॕस्ट्रेलिया वि. इंग्लंड, बर्मिंगहॕम, 1902

अतिशय कमी धावसंख्या असूनही अनिर्णित सुटलेला हा एकमेव सामना. आॕस्ट्रेलियन संघाच्या पहिल्या डावातील 36 धावांपैकी निम्मे धावा म्हणजे 18 धावा एकट्या व्हिक्टर ट्रम्पर यांनी सलामीला खेळताना केल्या. चार फलंदाज एकही धाव करु शकले नाहीत.

36- भारत वि.आॕस्ट्रेलिया, अॕडिलेड, 2020

भारतीय संघाला कमिन्स (4/21) व हेझेलवुडने (5/8) दुसऱ्या डावात 36 धावात गुंडाळले. त्यात मयांक अगरवालच्या 9 धावा सर्वाधिक ठरल्या. तीन फलंदाज शुन्यावरच अडकले.

38- आयर्लंड वि. इंग्लंड, लाॕर्डस्, 2019

आयर्लंडचा संघ दुसऱ्या डावात 38 धावात बाद होताना सलामीच्या जेम्स मॕक्कोलमच्या 11 धावा होत्या. चार फलंदाज खाते उघडू शकले नाहीत. याप्रकारे 1924 आणि आता 2020 चा सामना सोडला तर अतिशय कमी धावसंख्यांच्या डावातही किमान एकातरी फलंदाजाने दोन आकडीधावा केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER