
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाच्या दोन युवा खेळाडूंचे स्वप्न पूर्ण झाले. सलामीवीर शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी दुसर्या कसोटी सामन्यात पदार्पण केले.
सिराज आपल्या वडिलांचे स्वप्न केले पूर्ण
गेल्या महिन्यात मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) त्याच्या वडिलांचा अंतिम संस्कार करण्यास असमर्थ ठरला कारण तो राष्ट्रीय संघासह ऑस्ट्रेलियामध्ये होता. सिराजच्या पदार्पणानंतर त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, वेगवान गोलंदाजाने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करून अभिमान बाळगला.
भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात दाखल झाला आणि एका आठवड्यानंतर २० नोव्हेंबरला हैदराबादमध्ये २६ वर्षीय सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचे निधन झाले पण कोविड -१९ च्या निर्बंधामुळे तो घरी परतू शकला नाही. त्याचा भाऊ इस्माईल म्हणाला की वडिलांचे स्वप्न होते की सिराज कसोटी सामन्यात देशाकडून खेळावा आणि शेवटी त्यांचे स्वप्न शनिवारी MCG मध्ये पूर्ण झाले.
इस्माईल म्हणाले, ‘माझ्या (दिवंगत) वडिलांचे स्वप्न होते की सिराजने कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. त्यांना नेहमीच (सिराज) निळे आणि पांढर्या जर्सीमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना पाहायचे होते, म्हणून आज आमचे स्वप्न पूर्ण झाले.’ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याच्या पहिल्या दिवशी सिराजणेने १५ षटके फेकली. ज्यामध्ये त्याने ४० धावांत दोन गडी बाद केले.
सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाने राखले वर्चस्व
नाणेफेक जिंकल्यानंतर यजमानांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही. कांगारू सैन्य अवघ्या १९५ धावांवर बाद झाली. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने ४ गडी बाद केले तर रविचंद्रन अश्विनने ३ गडी बाद केले. मोहम्मद सिराजने २ आणि रवींद्र जडेजाने १ गडी बाद केला.
पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात १ विकेट गमावून ३६ धावा केल्या आहेत. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा १५९ धावांनी मागे आहे. टीम इंडियाकडून शुभमन गिल २८ आणि चेतेश्वर पुजारा ७ धावांवर नाबाद आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला