2021 चा टी-20 विश्वचषक भारतात की युएईमध्ये, उद्या होणार फैसला!

BCCI AGM to decide fate of T20 world cup

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) गुरुवार, 24 रोजी होणाऱ्या वार्षिक सभेत (AGM) टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 world Cup) कर्जमाफी आणि आयपीएलमधील नवीन संघांच्या समावेशाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय लाॕस एंजेल्स ऑलिम्पिक 2028 (Los angeles olympics 2028) मध्ये ऑलिम्पिकच्या समावेशाबाबतही चर्चा होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी ICC) प्रयत्नशील आहे. बीसीसीआयची ही 89 वी वार्षिक सभा अहमदाबाद येथे होणार आहे.

भारतात पुढील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी आयसीसी करमाफी मिळविण्यासाठी उत्सुक आहे आणि करमाफी न मिळाल्यास आयसीसी जी रक्कम देईल ती बीसीसीआयच्या उत्पनातून कापून घेण्यात येणार आहे. किंवा आयसीसीपुढे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत (UAE) हलविण्याचा पर्याय आहे. आयसीसीने पूर्ण करमाफीबाबत कळविण्यासाठी बीसीसीआयला 31 डिसेंबरची मुदत दिली आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा करार 10.20 अन्वये या स्पर्धेतून आयसीसीच्या वाट्याला येणारे सर्व उत्पन्न करमुक्त असावे असे बंधन भारतीय मंडळावर आहे. स्पर्धेच्या 18 महिने आधी याची निश्चिती करायची आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अजेंड्यावर हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. करमाफी मिळाली नाही तसृ आयसीसीकडून सदस्य मंडळांना मिळणारी रक्कम घटणार आहे.

31 डिसेंबरपर्यंत बीसीसीआयकडून या करमाफीची निश्चिती झाली नाही तर आयसीसी एकतर ही स्पर्धा युएईमध्ये हलवू शकते किंवा बीसीसीसीआयला ती करांची रक्कम चुकती करावी लागेल.

या मुद्द्यावरुन आधीच आयासीसी व बीसीसीआयमध्ये तणातणी सुरु आहे. 2016 मधील भारतातील टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या करांच्या रकमेसाठी आयसीसी आग्रही आहे आणि यासाठी त्यांनी बीसीसीआयच्या वार्षिक उत्पन्नातून ती रक्कम वळती करुन घेण्याचासुध्दा इशारा दिला आहे.

क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश हा आणखी एक मुद्दा असणार आहे. क्रिकेट आणि ऑलिम्पिक ही एक यशस्वी भागिदारी ठरेल असे आयसीसीने म्हटले असून क्रिकेटच्या समावैशाने ऑलिम्पिक चळवळीला आशियाई उपखंडातून मोठ्या संख्येने दर्शक व प्रशंसक मिळतील असा दावा केला आहे. त्यासोबतच ऑलिम्पिकमुळे क्रिकेटला त्याच्या पारंपरिक ठिकाणांपेक्षा जागतीक व्यासपीठ मिळेल, विशेषतः युरोप, अमेरिका व चीनमध्ये क्रिकेटचा प्रसार होईल असे आयसीसीने म्हटले आहे. आयसीसीने 2028 च्या लाॕस एंजेल्स आॕलिम्पिकचे लक्ष्य ठरवले आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर सहसदस्य देशांसाठी 130 लाख डॉलरचा निधी लागणार आहे.

आयसीसीने आखलेल्या योजनेनुसार ऑलिम्पिक क्रिकेटची स्पर्धा पुरुष व महिला गटात प्रत्येकी नऊ दिवसांची राहिल. त्यात 8 संघांदरम्यान टी-20 सामने होतील. दोन ठिकाणी टर्फ किंवा हायब्रीड खेळपट्ट्यांवर सामने होतील. यासाठी आयसीसीने आपल्या सर्व 104 सदस्य मंडळांना ही मागणी एकजुटीने लावून धरण्याचा आग्रह धरला आहे.

आतापर्यंत बीसीसीआय क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशाला फारसे अनुकूल नाही. ऑलिम्पिकमधील टी-20 सामन्यांमूळे द्वीपक्षीय मालिका व जागतिक टी-20 स्पर्धांच्या उत्पन्नावर परिणाम होईल अशी त्यांना भीती आहे. दुसरीकडे आयसीसीला वाटते की क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तर सदस्यांना निधीचे विस्तारीकरण होउन त्यांचे आयसीसीवर अवलंबून राहणे कमी होईल.

आयपीएलमध्ये दौन नव्या संघांच्या समावेशाच्या चर्चेने अलीकडे जोर पकडला आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. भारतातील अधिकाधिक प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळण्यासाठी आयपीएलच्या विस्ताराची गरज आहे असे बीसीसीआयच्या बहूतांश सदस्यांचे मत असल्याचे समजते. आता बीसीसीआय एक जादा संघ आणते की दोन आणि 2021 पासुन की 2022 च्या आयपीएलपासून याची चर्चा आहे. प्राप्त माहितीनूसार संघ वाढविण्याचा निर्णय झाला तर एक संघ अहमदाबादचा असेल हे जवळपास निश्चित आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यांच्या स्थळांवरही चर्चा होणार आहे. सध्या बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, मोहाली, धर्मशाळा, कोलकाता आणि मुंबई येथे सामने घेण्याचे ठरले आहे परंतु काही सादस्यांना आणखी इतर केंद्रांनाही सामना आयोजनाची संधी मिळावी असे वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER