मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील होणारच : अजित पवार

Ajit Pawar

मुंबई : सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत. बेळगाव, कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील सर्वांचा सक्रिय पाठिंबा आहे, असे त्यांनी सांगितले.

सीमाभागातील मराठी बांधवांच्या संघर्षाला मीदेखील जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी बांधवांचा लढा सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता तसेच महाराष्ट्र सरकार सीमाभागातील नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी
कर्नाटकात मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा निषेध मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनेही केला. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही, अशी दर्पोक्ती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली. सदवी यांच्या या वक्तव्याचा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. चंद्र, सूर्य कशाला? तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी बेळगाव महाराष्ट्रात असेल, असे प्रत्युत्तर हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मण सदवींना दिले.

शिवसेना
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही लक्ष्मण सदवी यांना प्रत्युत्तर दिले. ‘सूर्य-चंद्र तर राहतीलच, आम्हाला इतरांकडून ज्ञान घेण्याची गरज नाही, त्यांनी त्यांचे पाहावे. बेळगावचा सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, याची आठवण राऊत यांनी करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER