मराठी सिनेमा ‘वेल डन बेबी’चा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार प्रीमियर

Maharashtra Today

मराठी सिनेमांची वाढती मागणी पाहून काही ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी मराठी सिनेमांचे प्रीमियर करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसाद ओकच्या (Prasad Oak) ‘पिकासो’ सिनेमाचा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण्यात आला होता. कोकणातील दशावताराच्या खेळातील कलाकाराची कथा या मांडण्यात आली होती. त्यानंतर आता ‘वेल डन बेबी’ सिनेमाचा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्मवर केला जाणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रियंका तंवरने (Priyanka Tanwar) केले असून यात पुष्कर जोग, (Pushkar Jog) अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाचा प्रीमियर गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर ९ एप्रिल २०२१ ला केला जाणार आहे.

अॅमेझॉन सादर करत असलेला ‘वेल डन बेबी’ या सिनेमाची कथा वास्तवातील एका कुटुंबावरून प्रेरित अशी खरी कथा आहे. आधुनिक जगातील अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग हे तरुण जोडपे त्यांच्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न सुरु करतात. आत्मशोधाच्या मार्गावर घेऊन जाणारी ही कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा निर्मात्यांना विश्वास आहे.

या सिनेमाबाबत बोलताना पुष्कर जोगने सांगितले, “वेल डन बेबी हा माझा आवडता सिनेमा आहे. ही कथा मांडणे आणि व्यक्तिरेखांच्या भावभावनांचे हिंदोळे जिवंत करणे हा एक स्वतंत्र प्रवासच होता.” अमृता खानविलकरने सिनेमाबाबत बोलताना सांगितले, “वेल डन बेबीची कथा प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच हात घालेल. ही मनोरंजक कथा तुम्हाला हसवेलही आणि प्रसंगी भावनिकही करेल. अनेक अर्थांनी आपली वाटावी, अशी ही कथा आहे. आमच्या चाहत्यांना गुढीपाडव्याची भेट म्हणून हा सिनेमा सादर करताना मला फार आनंद होत आहे.” या सिनेमातून प्रथमच दिग्दर्शकाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणाऱ्या प्रियंका तंवरने सांगितले, “मराठी सिनेसृष्टीतील उत्तम कलाकारांसोबत काम करणे आणि एका चाचपडणाऱ्या कुटुंबाची गुंतवून ठेवणारी कथा मांडणे हा फार आनंददायक अनुभव होता. ही एक अपांरपरिक आधुनिक काळातील कथा आहे. कुटुंबातील प्रत्येक जण या सिनेमाचा आनंद घेऊ शकतो. यंदाच्या गुढीपाडव्याला प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल, त्यांचे मनोरंजन होईल याचा मला आनंद आहे.”

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडियाच्या कंटेट विभागाचे संचालक आणि प्रमुख विजय सुब्रमण्यम यांनी सांगितले, “गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर आमच्या ग्राहकांना दुसरा मराठी डायरेक्ट-टू-स्ट्रीमिंग सिनेमा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘वेल डन बेबी’ ही एक साधी मात्र गुंतवून ठेवणारी कथा आहे. भाषेपलीकडे जात विविध कथांमधून आमच्या प्रेक्षकांना सेवा देण्याच्या आमच्या उद्देशाला या नव्या सिनेमातून सुयोग्य बळकटी लाभणार आहे. असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button