मराठी पत्रकार ‘चाय-बिस्कुट’ खातील, पण प्रामाणिकपणा विकणार नाहीत – रोहित पवार

Rohit pawar

मुंबई : हाथरस (Hathras) प्रकरणात बेजबाबदार वार्तांकन करणाऱ्या माध्यमांना राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी चांगलंच सुनावलं आहे.भारतीय पत्रकारिता ही उच्च मूल्ये असलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात टिळक, आगरकर यांच्या जहाल पत्रकारितेचा सिंहाचा वाटा आहे. पण गेल्या काही काळातील घटनांवरून विशिष्ट माध्यम संस्थांकडून केली जाणारी पत्रकारिता पाहिली तर ती कोणत्या दिशेला चाललीय? असा संतापजनक प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामीचा (Arnab Goswami) व्हिडीओ पोस्ट करत, ते म्हणाले की, आधी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि आता हाथरस मधील घटनेवरून हे अधिक प्रकर्षाने जाणवतंय.

एकतर सरकारकडून हाथरस मधील पीडितेच्या कुटुंबाला गुन्हेगारांसारखी वागणूक मिळतेय. त्यांना घरात बंद करुन त्यांच्याकडील फोन हिसकावून घेतलेत आणि संपूर्ण गावाला पोलीस छावणीचं स्वरुप दिलंय. का तर पीडित कुटुंबाला कुणी भेटू नये म्हणून. एवढंच नाही तर तिथं जाणाऱ्या खासदारांनाही मारहाण केली जातेय. पत्रकारांचे फोन टॅप करुन दिशाभूल करणारे ऑडिओ फिरवले जात आहेत, याला काय म्हणावं?

पीडितेची बातमी दाखवण्याऐवजी खोट्या बातम्या तयार करण्याची नवीन पत्रकारीताच त्यांनी सुरू केलीय. ते तुम्ही सोबतच्या व्हिडीओत पाहू शकता. याला पत्रकारितेऐवजी सर्कस म्हणणंच अधिक संयुक्तिक ठरेल. यापेक्षा कितीतरी अधिक उत्तम माझे मराठी आणि महाराष्ट्रात काम करणारे इतर पत्रकार मित्र आहेत. जे ‘चाय-बिस्कुट’ खाऊन राहतील पण आपला प्रामाणिकपणा कधीही विकत नाहीत. अर्थात यामध्ये प्रतिमा मिश्रा या हिंदी माध्यमाच्या पत्रकार भगिनीची कामगिरीही अभिमान वाटावी, अशी आहे. त्यामुळं आभाळ फाटलंय पण शिवणारेही खंबीर आहेत, असंच म्हणावं लागेल. अशी जहाल टीकाही रोहित पवारांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला
MT LIKE OUR PAGE FOOTER