बॉलिवुडवर राज्य करणाऱ्या मराठी नायिका

बॉलिवुडवर राज्य करणाऱ्या मराठी नायिका

एक काळ मराठी चित्रपटांनी गाजवला होता. एकाहून एक सरस नायक, नायिकांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. परंतु दुर्देव असे की काही अपवाद वगळता (चटकन आठवणारी नावे म्हणजे संध्या, स्मिता पाटील) मराठी चित्रपटसृष्टीतील मुख्य कलाकार कधीच हिंदीत यशस्वी झाले नाहीत. सुलोचना आई म्हणूनच हिंदीत लोकप्रिय होत्या. असे असले तरी काही मराठी नायिकांनी मात्र बॉलिवुडवर (Bollywood) वर्षानुवर्षे राज्य केले. दाक्षिणात्य आणि पंजाबी नायिकांना तोंड देत सर्वोच्च पद गाठले. बरं या नायिका केवळ शोभेच्या बाहुल्या होत्या असे नाही तर त्यांनी स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावरही गारुड केले.  एवढेच नव्हे तर आजही त्यांचा दबदबा कायम आहे.

अशा नायिकांचा विचार सुरु केल्यावर लगेचच डोळ्यासमोर नाव येते ते माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit). 36 वर्षांपूर्वी राजश्रीच्या अबोध (Abodh) चित्रपटापासून माधुरीने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आणि काही वर्षातच बॉलिवुडची आघाडीची नायिका म्हणून ओळखू जाऊ लागली. अर्थात यासाठी तिला खूप संघर्षही करावा लागला. 36 वर्षे कायम चर्चेत आणि कार्यरत राहिलेली दुसरी नायिका कोणी असेल असे वाटत नाही. पडद्यावर तिच्या अदाकारीने फिदा झालेला प्रेक्षकवर्ग चित्रपटापेक्षा माधुरीला बघायला येत असे. माधुरीचे मधुबालासारखे दिसणे, हसणे यामुळे मधुबालाचे पुनरागमन झाले असेच म्हटले जाऊ लागले होते. हिंदीत पूर्ण करिअर केल्यानंतर आत्ता आत्ता माधुरी बकेट लिस्टच्या (Backet List) माध्यमातून मराठीत अवतरली होती.

माधुरी दीक्षित प्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड यश, पैसा, मानमरातब आणि आदर मिळवणारी दुसरी नायिका म्हणजे नूतन. शोभना समर्थ या मराठी अभिनेत्रीची ही मुलगी. या मुलीनेही बॉलिवुडवर जवळ-जवळ 40 वर्षे काम केले. शेवटच्या टप्प्यात कर्करोग झाला असतानाही नूतनने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. माधुरीने मात्र अजूनपर्यंत अशा आईच्या भूमिका साकारण्यास सुरुवात केलेली नाही. त्या काळातील सर्व मोठ्या नायकांसोबत म्हणजेच राज कपूर, देव आनंद, दिलीपकुमार, सुनील दत्त ते अगदी धर्मेेद्र, अमिताभच्या नायिकेपर्यंत नूतनने काम केले. अनिल कपूरची आईही झाली. मराठी असूनही नूतनने आपल्या आयुष्यात फक्त एकच मराठी चित्रपट केला आणि तो म्हणजे पारध. नूतन मराठीत येणार म्हटल्यानंतर या चित्रपटाची  प्रचंड चर्चा झाली होती. किशोर मिस्किन यांनी १९७७ मध्ये पारधची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. नूतनने या चित्रपटात रमेश देवच्या पत्नीची भूमिका साकारली होती. सचिन सारिका ही जोडीही या चित्रपटात होती. सचिनने नूतनच्या मुलाची भूमिका साकारली होती. तर श्रीराम लागू खलनायक झाले होते. कथा, पटकथा, संवाद मधुसूदन कालेलकर यांचे तर ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर, वंदना विटणकर, मधुसूदन कालेलकर यांनी गीते लिहिली होती. आणि विशेष म्हणजे एका गाण्यात नूतनचाही आवाज होता.

नूतनची बहिण तनुजाही हिंदीतील सुपरस्टार नायिका होती. नूतनप्रमाणेच तनुजानेही सर् मोठ्या नायकांसोबत काम केले होते आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. तनुजानेही नूतनप्रमाणे झाकोळ आणि पितृऋण या दोन मराठी चित्रपटात काम केले होते.

स्मिता पाटीलने (Smita Patil) मराठीतून सुरुवात करून हिंदीत स्वतःचे स्थान निर्माण केले होते.  उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून स्मिता पाटीलकडे पाहिले जात असे. ग्लॅमरचा अभाव असला तरी काही हिंदी चित्रपटात स्मिताने आपल्या ग्लॅमरलचे गुण दाखवलेच होते. हिंदी आणि मराठी अशा दोन्हीकडे यशस्वी असलेली एकमेव नायिका म्हणजे स्मिता पाटील असे म्हटले तर चूक ठरणार नाही.

रंगीलाने सगळ्या बॉलिवुडला वेड लावणाऱ्या उर्मिला मातोंडकरनेही (Urmila Matondkar) बॉलिवुडमध्ये स्वतःचा ठसा उमटवला होता. सलमानपासून गोविंदा, संजय दत्तपर्यंत सगळ्या नायकांबरोबर तिने काम केले होते. तिचे अनेक चित्रपट यशस्वीही झाले परंतु ती लवकरच चित्रपटसृष्टीबाहेर गेली. काही वर्षांपूर्वी आजोबा या मराठी चित्रपटातून ती मराठीत आली होती. अश्विनी भावे, वर्षा उसगावकर यांनीही काही हिंदी चित्रपटात नायिकेच्या भूमिका साकारल्या पण त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. आताच्या मराठी नायिका हिंदी चित्रपटांमध्ये आई किंवा बहिणीच्या भूमिकांमध्येच दिसतात. ज्याप्रमाणे पूर्वी ललिता पवार, जयश्री गडकर, सुलोचना, सीमा, उषाकिरण काम करायच्या तशाच आताच्या मराठी नायिकांच्या भूमिका असतात.

असे असले तरी हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवल्यानंतर केवळ नूतन आणि माधुरीचीच मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. त्यामुळे या दोघीच खऱ्या अर्थाने बॉलिवुडवर राज्य करणाऱ्या मराठी नायिका होत्या असे म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटते?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER