
मार्गशीर्ष महिना आला की थंडीचा कडाका जाणवायला लागतो. उत्तरेकडील थंड वारा शरीराला बोचतो. हेमंत ऋतुची लक्षणे व त्याचे शरीरावर होणारे परीणाम आयुर्वेद ग्रंथात वर्णित आहेत. शरीराला थंड वातावरणाचा मारा बसत असतो त्यामुळे देहोष्मा (उष्णता) शरीराच्या आत कोष्ठात प्रवेश करते जाठराग्नि प्रदीप्त करते. त्यामुळे थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते. तसेच खाल्लेले लवकर पचते.
म्हणूनच आहारात बदल करणे आवश्यक ठरते. शरीराला पुष्ट करणारा, स्निग्ध आहार या काळात आवश्यक ठरतो. इंधन नसेल तर जशी चूल विझते त्याप्रमाणे असे आहाररूपी इंधन जाठराग्निला मिळाले नाही तर तो थंड होईल आणि शरीरातील रसरक्तादि सप्त धातूंचा क्षय होतो. म्हणून हेमंत ऋतुत तूप असेलेले, स्निग्ध पदार्थ घ्यावे. गुळ तूप घालून केलेले लाडू सांजोरी खीर याचा समावेश करावे. उडद, ऊस, दूधापासून बनविलेले पदार्थ, तांदूळ, गहू यांचा समावेश करावे.
हेमंत ऋतु हा एकमेव ऋतु असा आहे की ज्यावेळी सकाळी नाश्ता घेण्यास आयुर्वेदाने (Ayurveda) सांगितले आहे. परंतु ते ब्रेड बिस्किट आंबवलेले शिळे पदार्थ नसावे. तूप पोळी, पराठा, थालीपीठ लोणी, सांजोरी, खीर, हलवा अशा कितीतरी आपल्या पारंपारिक पाककृती याकाळात उपयोगी ठरतात.
जेवणात आमसूलाची चटणी, कोशींबीर, आवळा, आमसूलाचे वा चिंचेचे सार, ज्वारी / बाजरीची भाकरी, ऋतुनुसार येणाऱ्या सर्व भाज्या नक्की घ्याव्या.
थंड पदार्थ, फ्रीजचा वापर, कोरडे पदार्थ टाळावेत.
विहार – हा काळ स्वास्थ्यवर्धक सांगितला आहे. दिवस लहान रात्र मोठी असते. याकाळात व्यायाम, अंगाला तेल उटणे लावून स्नान करावे. उन्हात बसणे, स्नानाकरीता स्वच्छतेकरीता सुखोष्ण पाणी वापरावे. रात्री उबदार आंथरूण पांघरुणाचा वापर करावा.
हेमंत ऋतु हा बल वाढविणारा काळ आहे या काळात भूक वाढते शरीर पुष्ट होते म्हणूनच स्वास्थ्यवर्धक काळ सांगितला आहे. या काळात भाज्या फळे भरपूर उपलब्ध असतात. त्यामुळे त्याचा नक्कीच समावेश करावा.
ह्या बातम्या पण वाचा :
- ऋतुनुसार पंचकर्म चिकित्सा !
- शरद ऋतुचर्या – ऋतुनुसार आहारात बदल स्वास्थ्य रक्षणार्थ आवश्यक !
- ब्राह्म मुहूर्त उत्तिष्ठेत् – स्वास्थ्यरक्षण उपाय !
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला