कापूर – पूजेमधे असो वा स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा !

घनसार, चन्द्र, शीतकर, गौर, सित, हिमाभ्र असे विविध पर्याय असलेला कापूर पूजेवेळी आवश्यक असतो. देवाच्या आरतीसह कर्पूर आरतीसुद्धा म्हटल्या जाते एवढे महत्त्व या कापूराला आहे. भीमसेनी कापूर पांढरा स्वच्छ पारदर्शक व पाण्यात बुडतो. औषधात वापरण्याच्या दृष्टीने हा योग्य ठरतो. पक्व अपक्व असे दोन प्रकार कापूराचे सांगितले आहेत. अपक्व कापूर झाडाच्या ढोलीत जमा होणारा निर्यास असतो. हा श्रेष्ठ सांगितला आहे.

कापूर स्थानिक वातवाहिन्यांना उत्तेजित करून नंतर अवसादित करतात त्यातून गारवा अनुभवायला मिळतो. व्रण, जखम भरून येणाऱ्या मलमांमधे सहसा कापूर तेल असते. कारण कापूर दुर्गंधी कोथ दूर करणारे असते. वेदना शांत करणारे असल्यामुळे अनेक प्रकारच्या तेलांत मिसळून अथवा पेन बाममधे वापरून संधिवात, बरगड्या दुखणे, खोकला न्यूमोनिया या विकारांमधे चोळण्याकरीता वापरतात. त्वचा विकारांवर कापराचे तेल लावण्यास वापरतात.

दात दुखणे दंतविकार पूयदंत या अवस्थेत कापूरतेल किंवा दंतमंजनात मिसळून लावल्याने फायदा होतो. वेदना शांत होतात. तीक्ष्ण उग्रगंधी असल्याने प्राणवह स्रोतसा वर उत्तम कार्य करणारा आहे. कफ पातळ करून सहज सुटतो व बाहेर पडतो म्हणून श्वास कास कण्ठ रोग यात वापरतात. धूपन करणे. रुमालावर कापराचे तेल लावून वास घेणे कापराच्या तेल छातीवर चोळणे यामुळे कफ पातळ होतो. तसेच खोकल्यामुळे वा दम लागल्याने छाती बरगड्या दुखत असतील तर आराम मिळतो.

कापूर हृदयाला उत्तेजना देणारा हृदयाला संरक्षक आणि रक्तभार वाढविणारा आहे. स्तन्यस्राव कमी करणारा असल्याने अति प्रमाणात बाळंतीणीला दूध येऊन गाठी होत असतील तर कापूराचा लेप स्तनावर करतात. कृमी जंतामुळे डोक्यावरील किंवा पापण्यांवरील केस गळत असतील तर कडूलिंबाच्या रसात कापूर मिसळून लावावा. ताप असल्यास कापूर मिसळलेल्या पाण्याच्या पट्टया ठेवाव्या. घरातील कुबट वास जाण्याकरीता वातावरण शुद्धी करण्याकरीता कापूर नक्कीच फायदेशीर ठरतो. कर्पूरासव, अमृतबिंदू, कर्पूरादि चूर्ण, कर्पूरादि वटी लवंगादि चूर्ण असे विविध कल्प कर्पूर वापरून केले जातात. असा हा धार्मिक अनुष्ठानात अतिशय महत्त्वाचा तेवढाच आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर कर्पूर.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER