गर्भधारणा होण्यापूर्वी …

आपल्याला सुंदर स्वस्थ धष्टपुष्ट बाळ ही प्रत्येक पतीपत्नीची इच्छा असते. त्यामुळे गर्भधारणा झाली की काय खावे काय खाऊ नये याची एक लिस्टच तयार होते. प्रत्येक जण आपआपल्या अनुभवावरुन सल्ले देणे सुरु करतो. आजकाल सोशल मिडीयावर असे अनेक ग्रूप देखील बघायला मिळतात. एकमेकांना त्रास काय होतो किंवा काय खावे काय ऐकावे यावर विचारांची देवाण घेवाण सुरु असते. प्रत्येकाची प्रकृती, अवस्था वेगवेगळी असते त्यामुळे दुसऱ्याला फायदेशीर ठरलेले नुस्खे लागू पडतील याची शाश्वती नसते. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असतो. हे सर्व प्रेगन्सी मधे आपण अनुभवले असेल. पण फक्त प्रेगन्सीमधीलच काळजी धष्टपुष्ट बाळाच्या जन्माकरीता पुरेशी आहे का?

आयुर्वेदात (Ayurveda) गर्भधारणेपूर्वी स्त्री पुरुषाची शरीर व मनाची तयारी आवश्यक सांगितली आहे.

आजच्या काळात खरच याची गरज आहे का?

आजकाल धकाधकीच्या काळात, चुकीच्या आहार पद्धती यामुळे शरीरात काहीना काही बदल झालेले असतात. शुक्र व स्त्रीबीज यांच्या संयोगानेच गर्भनिर्मिती होत असते. या पुरुष बीज व स्त्रीबीज शुद्धीकरीता आयुर्वेदात गर्भधानाच्यापूर्वी पंचकर्मा व्दारे शरीरशुद्धी आहार विहाराचे नियोजन करण्यास सांगितले आहे. यालाच आपण गर्भाधानपूर्वक संस्कार किंवा pre conception period म्हणू शकतो. पतीपत्नी ते भावी आईवडील बनण्याचा हा काळ. यात चिकित्सा आहार विहार विचार मन या सर्वांचा विचार केला जातो.

आयुर्वेदात गर्भ हा षडभावात्मक सांगितला आहे. आईच्या बीजापासून काही अवयव उत्पन्न होतात त्याला मातृज भाव उदा. सर्व soft organ. पितृज भाव उदा. केश अस्थि श्मश्रू हे पित्याकडून येतात. हे आपण ऐकले असेल परंतु आयुर्वेदात यापेक्षाही सूक्ष्म विचार केला आहे. आत्मज भाव (आत्माचे गुण), रसज (आईने घेतलेल्या आहारातून निर्माण झालेले उदा. तृप्ती पुष्टि वृद्धि) सत्त्वज (मानसिक स्थिती उदा. शील मोह क्रोध उत्साह शौर्य इ.) सात्म्यज (उदा. आरोग्य, वर्ण स्वर बीज संपत इ.) या सर्व षडभावांचा विचार गर्भ राहण्या पूर्वी पासूनच केला जातो.

नवीन वास्तू प्रवेश करतांना स्वच्छ निटनेटक्या घर असले की मन सुखावते राहण्याची मजा येते. त्याकरीता आपण अनेक दिवस तयारी, स्वच्छता, सजावट करीत असतो मग ही तयारी आयुष्याला कलाटणी, अत्यानंद देणाऱ्या बाळाच्या आगमनापूर्वी तर नक्कीच करायला हवी !

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER