पानिपतकडे मराठ्यांची कूच

पानिपत शौर्यशाली रणसंग्राम दिन

कोल्हापूर : 14 जानेवारी पानिपत (Panipat) शौर्यशाली रणसंग्राम दिन… या दिवशी मराठ्यांनी पराक्रम दाखवून एक प्रकारे विजय मिळवला… हा विजय म्हणजे अब्दाली पुन्हा कधीही हिंदुस्थानवर चालून आला नाही… या युद्धात प्राणाची आहुती देणाऱ्या मराठ्यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरसह महाराष्ट्रातील मराठा मावळे आज पानिपतच्या दिशेने मार्गस्थ झाले. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मराठा मार्गस्थ झाले.

पानिपतच्या लढाईतील शहीद वीरांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी 14 जानेवारी मराठा शौर्य दिवस. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे वतीने प्रत्येक वर्षी शौर्य दिन साजरा केला जातो. ह्या वर्षीही मराठा शौर्य दिवस कोरोणामुळे साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. भारतातील 17 राज्यासह विदेशातील सुध्दा मराठा बांधव या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कोल्हापुरातूनही मराठा जागृती मंच पानिपतचे राज्य मुख्य संघटक मिलिंद पाटील,गोवा राज्य संघटक राजाराम पाटील, दिलीप सासणे, युवा संघटक प्रांजल लोखंडे व सागर शेटे, हेमंत निकम आदी सदस्य रविवार रवाना झाले. पानिपत मोहिमेअंतर्गत गुजरात, राजस्थान, इंदोर देवास, ग्वाल्हेर इत्यादी मराठा मंडळांच्या भेटी घेऊन पुढे पानिपतला रवाना होणार आहेत.

रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंचचे संस्थापक मार्गदर्शक ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्वजन पानिपतला रवाना झाले. दरम्यान, डॉ. वसंतराव मोरे म्हणाले, जगातलं मोठे युद्ध मराठ्यांनी पानिपतच्या रणभूमीवर लढलं. आणि त्यात आपण एक प्रकारे जिंकलो. ते म्हणजे पुन्हा अबदाली हिंदुस्थानकडे आलाच नाही. हा मराठ्यांचा कडवा लढा सर्वांना कळावा यासाठी 14 जानेवारीला पानिपत शौर्य भूमीला वंदन करणे महत्त्वाच आहे. इतिहास शौर्यशाली, गौरवशाली आहे, हा इतिहास विसरता कामा नये.

यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रिय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहासकार डॉ. आनंद पाटील, दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे, मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयक प्रज्ञा जाधव, विनोद साळोखे कोल्हापूर युवा संघटक आदित्य पाटील, ओमकार माने, यश पराते, रुपेश शिरगुप्पे, युवराज शिरोले, आविष्कार पवार आदीसह मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER