मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी; पवारांसमोर आशिष शेलारांचे मोठे विधान

Ashish Shelar - Sharad Pawar

मुंबई : मराठा समाजातील (Maratha Community) महिला मुख्यमंत्री व्हावी, असं सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शेलार यांनी हे विधान केल्यानं सध्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत असताना शेलार यांनी केलेल्या विधानानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलारांनी मराठा समाजातल्या स्त्रियांच्या कर्तृत्त्वावर भाष्य केलं. ‘मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती फार कमी असतात. ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकात शरद पवारांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल जे लिहिलंय, ते अतिशय प्रेरणादायी आहे. मराठा समाजातली कर्तृत्ववान स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं मला वाटतं. तसं होणार असेल, तर त्याला माझं समर्थन आहे,’ असं शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेलार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अनेकांनी शेलार यांच्या विधानाचा संदर्भ भाजपमध्ये (BJP) सुरू असलेल्या ताज्या घडामोडींशी जोडला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. या निवडणुकीच्या प्रभारीपदी आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांची नेमणूक करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीला शेलार गैरहजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER