मराठा आरक्षण : पुढील सुनावणी २२ जानेवारीला

maratha-reservation-supreme-court

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर पडली असून या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर जानेवारी महिन्यात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मराठा आरक्षणावरील सर्व याचिकांचे एकत्रीकरण करण्याचे आदेश रजिस्ट्रार यांना दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी होईल, असे त्यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवत मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय दिला होता. मात्र शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के मराठा आरक्षण देण्याऐवजी 12 किंवा 13 टक्के देण्याचे निर्देश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी लांबणीवर पडली असली तरी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्यातरी आरक्षणावर याचा परिणाम होणार नाही, अशी माहिती मराठा आरक्षणाच्या बाजूने न्यायालयात लढणारे विनोद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.