संभाजीराजेंचा एल्गार, संयम संपल्याचे सांगत १६ जूनला पहिल्या मोर्च्याची घोषणा

Maharashtra Today

रायगड : खासदार संभाजीराजेंसह केवळ २२ जणांच्या उपस्थितीत रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी संभाजीराजेंनी (Sambhaji Raje)मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation)आपली पुढची भूमिका स्पष्ट केली. येत्या १६ जूनपासून मराठा आंदोलनाला सुरूवात करणार असल्याची घोषणा केली.

यावेळी उपस्थित शिवभक्तांना संबोधित करताना संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजावर आतापर्यंत अन्यायच होत आला आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम बघितला आहे. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे मी संयम राखू शकणार नाही. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आंदोलन करण्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही. माझं जे काय होईल ते होईल याची चिंता मला नाही. यासाठी आंदोलन करणे निश्चित आहे. येत्या १६ जूनला छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईपर्यन्तहा लॉंगमार्च राहणार असल्याचे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आजपासून मी माझा संयम मी बाजूला ठेवला आहे. खासदार लोकसभेचा पगार घेतात, आमदार विधानसभेचा पगार घेतात. तुमची जबाबदारी आहे ती. पण कुठलाही आमदार पुढे आलेला नाही. तुमची काय जबाबदारी आहे यावर बोला. आत्ताच्या सरकारला हात जोडून विनंती केली. पण तरी काही फरक पडत नाही. आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत. समितीने काही वेगळं सांगितलं नाही. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करा, समाजाला वेठीस धरू नका. मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावार अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे.

मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही. आताही वेळ गेलेली नाही सर्व पक्षीय नेत्यांनी मराठा आरक्षणाचे समर्थन करत आम्हाला सहयोग करावा असे आवाहनही संभाजीराजेंनी केले.

मी आज घेतलेल्या भूमिकेबद्दल लोकं नाराज झाले तरीमला त्याची पर्वा नाही. पण मी समाजाची दिशाभूल करुन त्यांना वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज झाले आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button