मराठा आरक्षण : कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना नवी मुंबईत घेतले ताब्यात

Maratha reservation.jpg

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा पुढे ढकला, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्च्याचे  (Maratha Kranti Morcha) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा क्रांती  मोर्च्याच्या  समन्वयकांनी एमपीएससी आणि राज्यसेवा परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी मराठा क्रांती  मोर्च्याचे   कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर आंदोलनाच्या तयारीत होते. या आंदोलनातील कार्यकर्ते आबा पाटील आणि काही कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) रात्रीच ताब्यात घेतले.

काल संध्याकाळी मराठा क्रांती  मोर्च्याच्या  कार्यकर्त्यांनी एमपीएससी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. त्याच दरम्यान कोल्हापूरच्या मराठा कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘मातोश्री’बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून अतिरिक्त पोलीस तैनात केले आहेत. मातोश्रीवरील आंदोलनापूर्वीच मराठा क्रांती  मोर्च्याच्या  कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पहाटे ४ वाजता त्यांना पुण्यात नेऊन सोडले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ठरल्याप्रमाणे ११ ऑक्टोबरलाच होणार असून, राज्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे आयोगानं १६ सप्टेंबरला सरकारला विचारणा केल्यानंतर परीक्षेचे नियोजन केले आहे.

आरक्षणाच्या निर्णयानंतर आणि कोरोनावरची लस उपलब्ध झाल्यानंतरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घ्यावी, अशी मराठा संघटनांची मागणी आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. अन्यथा ६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करू, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. आता मराठा आंदोलन येत्या काळात आणखीन चिघळण्याची चिन्हे दिसते आहे.

१० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद

मराठा आंदोलकांनी १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बंद शांततेत करण्यात येईल. कुणीही ‘खळखट्ट्याक’ करू नये, दगडफेक करू नये, असे आवाहन मराठा आरक्षण संघर्ष समितीने केले आहे. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. काही महामार्ग अडवले जातील. रास्ता रोको केला जाईल. मात्र, बंदला हिंसक वळण लागले तर सरकारच जबाबदार असेल, असे संघटनांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER