मराठा आरक्षण : अशोक चव्हाणांवर अवलंबून राहू नका; विनायक मेटेंची टीका

Vinayak Mete - Ashok Chavan

मुंबई : “उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) द्यायचे नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे मराठा समाजावर ही वेळ आली आहे. आरक्षण टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर अवलंबून राहू नका”, अशी टीका आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली.

“मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही याबाबत समाजात अस्वस्थता आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकवण्यासाठी अशोक चव्हाण यांच्यावर अवलंबून राहू नये. मराठा आरक्षणाच्या संबंधित सर्व संघटना आणि नेत्यांची बैठक बोलावण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनीही ही विनंती मान्य केली आहे. तीन – चार दिवसांत बैठक बोलावली जाईल”, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं मेटे म्हणाले.

“आरक्षण टिकवण्यासाठी नेमकी काय रणनिती आहे हे उपसमितीने आणि सरकारने समाजाला सांगावे. मराठा आरक्षणाला होत असलेला विलंब आणि समाजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने यापुढची पावले टाकावीत”, असे ते म्हणाले.

सरकारमधील मंत्रीच जातीयवादी भूमिका घेत आहेत, असा आरोप मेटे यांनी केला. जे नेते – मंत्री उठता बसता फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतात तेच जातीयवादी भूमिका घेतात, असे म्हणत मेटे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-NCP) मंत्र्यांवर टीका केली. सरकारमधील काही मंत्री समाजा-समाजामध्ये भांडणं कशी लागतील हे पाहतात असाही आरोप मेटे यांनी केला. अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी विशेष समज द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

औरंगाबाद नामांतर : काँग्रेसचा (Congress) विरोध जुमानू नका

“औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर (Sambhaji Nagar) करण्याची चांगली संधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या काळात आली आहे. त्यांनी ती दवडू नका. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी त्यांच्या काळात खूप प्रयत्न केले होते. यामध्ये काही अडचणी असतील तर त्या मुख्यमंत्र्यांनी दूर कराव्यात. त्यांच्या सरकार मधील काही पक्षांनी त्यांची मतं अबाधित ठेवण्यासाठी जरी विरोध केला तरी त्यांनी त्यांच्या विरोधाकडे लक्ष देऊ नये”, असे आवाहन मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER