मराठा आरक्षण : उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची भेट घेणार

मुंबई :- मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हालचाली सुरू केल्या आहे. उद्या मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मोदी-ठाकरे यांच्या भेटीकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील. यावेळी आघाडी सरकारमधील काही मंत्री त्यांच्यासोबत असतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोदी-ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button