
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील छावा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाचही आंदोलकांना ताब्यात व मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात नेले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यात अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवकर्ण वाघ पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष जेधे, जिल्हाकार्याध्यक्ष राधाकिशन शिंदे, अंबड तालुकाध्यक्ष राधेश्याम पवळ आणि घनसावंगी तालुकाध्यक्ष नानासाहेब जोगदंड व युवक जिल्हासंघटक ज्योतिराम माने यांचा समावेश आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, आझाद मैदानात २९ दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या मुलांच्या नोकरीचा प्रश्न तत्काळ सोडवा आणि सरकाने जाहीर केलेली भरती प्रक्रिया त्वरित थांबवा, अशी त्यांची मागणी आहे.
हे कार्यकर्ते आज दुपारी दोनच्या सुमारास मंत्रालयासमोर आलेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. आंदोलक गाडीतून उतरताच पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी सर्व आंदोलकांच्या खिशात असलेल्या विषयाच्या बाटल्या काढून घेतल्या आणि त्यांना मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात घेऊन गेले. काही वेळाने त्यांना पोलीस बंदोबस्तात मुंबईबाहेर पनवेल येथे सोडण्यात आले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला