मराठा आरक्षण १९०२ ते २०२१ (भाग १): मराठा आरक्षणाचे जनक छ.शाहू महाराज ते पहिले शहिद अण्णासाहेब पाटील….!

शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी काढलेल्या हुकूमात भारतात सर्वात आधी आरक्षण लागू झालं. त्यात मराठा आणि कुणबी समाजासह इतर मागास घटकांना आरक्षण देण्यात आलं होतं. तो हुकुम असा होता, ‘…महाराज सरकार असा हुकूम करतात की, हा हुकूम पोहोचलेल्या तारखेपासून रिकाम्या झालेल्या जागांपैकी शेकडा ५० जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या ऑफिसमध्ये मागासलेल्या वर्गाच्या अंमलदाराचे प्रमाण सध्या शेकडा ५० पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्णातील व्यक्तीची करावी. या हुकमाच्या प्रसिद्धीनंतर केलेल्या सर्व नेमणुकांचे तिमाही पत्रक प्रत्येक खात्याच्या मुख्याने सरकारकडे पाठवावे. मागासलेल्या वर्णाचा अर्थ ब्राह्मण, प्रभू, शेणवी, पार्शी व दुसरे पुढे असलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा. ’शाहू महाराजांनी मागासवर्गासाठी कायदा निर्माण केला आणि मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण दिलं. यानंतर १९४२ ते १९५२ पर्यंत बॉम्बे सरकारच्या काळात दहा वर्षे आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळाला.

स्वातंत्र्यानंतर मराठा आरक्षणाचा संघर्ष खऱ्या अर्थाने 1981 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil) यांनी सुरू केला. त्या अगोदर मराठा समाज आरक्षणांच्या संघर्षात कधीही सहभागी नव्हता. मराठा समाजातही गरिब आणि श्रीमंत अशी आर्थिक दरी निर्माण होत होती. काही प्रस्थापित झाले मात्र बहुसंख्य विस्थापित होत राहिले. ही बाब माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या लक्षात येत होती. यावर त्यांनी अस्वस्थ होत मोर्चे बांधणीला सुरूवात केली. मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षणाचं महत्व पटवून देत त्यांनी ‘आखिल भारतीय मराठा महासंघ ‘ स्थापन केली.

२२ मार्च १९८२ ला मुंबईत मराठा आरक्षणासह इतर ११ मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा अण्णासाहेब पाटलांनी काढला. “मराठा समाजाला त्वरित न्याय आणि आरक्षण नाही मिळाले तर मी उद्याचा सुर्योदय पाहणार नाही” अशी शपथ अण्णासाहेबांनी घेतली होती. हा मोर्चा धडकी भरवणारा होता. या मोर्चाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक जमले होते. अण्णासाहेब पाटील यांनी हा मुद्दा स्वाभिमानाचा केला होता.

तेव्हा महाराष्ट्रात कॅांग्रेस (आय) सत्ता होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले (Babasaheb Bhosale). तर विरोघी पक्षाचे नेते होते शरद पवार. शरद पवार (Sharad Pawar) हे तेव्हा कॅांग्रेस ( एस) पक्षाचे प्रतिनिधित्व करत होते. मराठ्यांचा हा मोर्चा पाहून मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेना जनतेच्या मनात असलेल्या आक्रोशाचं गांभीर्य कळालं आणि मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) निर्णय जाहीर करू अशी त्यांनी ग्वाही दिली. पण त्यादिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही.

अण्णासाहेब स्वाभिमानी नेते होते, आता समाजाला ‘काय उत्तर देऊ ? ‘ह्या प्रश्नाने अण्णासाहेब खूप व्यथित व अस्वस्थ झाले होते. दुसऱ्याच दिवशी म्हणून स्वाभिमानी अण्णासाहेब पाटलांनी दि. २३ मार्च १९८२ साली डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

एकीकडे महाराष्ट्रात गटातटाचं राजकारण सुरू होतं आणि त्यात बाबासाहेब भोसले सरकार पडले, त्यांनी फेब्रुवारी १९८३ साली राजीनामा दिला, नंतर वसंतदादा पाटलांनी (Vasantdada Patil) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या सर्व राजकारणात आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडला ….क्रमशः

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण १९०२ ते २०२१ (भाग २): आयोग ते राणे समिती, आरक्षणाचा अध्यादेश आणि कॅांग्रेस- राष्ट्रवादीचा पराभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button