पंढरपुरात संचारबंदी : ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’कडून राज्यभरात चक्काजामचा इशारा

Marathi Kranti Morcha

पंढरपूर : सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारतर्फे कुठल्याही हालचाली केल्या जात नसल्याने राज्यातील मराठा समाज अधिकच आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून ७ नोव्हेंबर अर्थात उद्या पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपासून ते ७ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या संचारबंदी आदेशाची आज होळी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा आदेश मागे घेतला नाही तर राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरमधून मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आक्रोश मोर्चा निघेलच, असा निर्धारही मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

एकूण २० दिवस हा मोर्चा असणार आहे. रोज २० ते २५ किलोमीटर अंतर कापण्यात येईल. मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे सदस्य या आंदोलनात सहभागी होणार आहे. पंढरपूर ते मंत्रालय हा आक्रोश मोर्चा अकलूज, नातेपुते, बारामती, पुणे मार्गे मुंबई असा जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसह अनेक मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER