… आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने घातला ओबीसी कोट्याला हात

Marathi Kranti Morcha

मुंबई : आतापर्यंत मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने, सरकार न्यायालयातील स्थगिती उठवण्यात असमर्थ ठरले, तर मराठा समाजाला ओबीसी समुहात समाविष्ट करुन आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. या मागणीचे ओबीसीत प्रतिसाद उमटण्याची शक्यता आहे.

मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची आज (१० जानेवारी) रोजी मुंबईतील आझाद मैदानात राज्यस्तरीय सभा झाली. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख समन्वयकांनी मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर ठराव संमत केले. उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत ओबीसी आरक्षणातून आरक्षण न घेता स्वतंत्रपणे आरक्षण द्या, अशी भूमिका घेणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आता ओबीसी कोट्याला हात घातला आहे. सरकार न्यायालयातील स्थगिती उठवण्यात असमर्थ ठरले, तर मराठा समाजाला ओबीसी समुहात समाविष्ट करुन आरक्षण द्या, अशी खुली मागणी केली. (Maratha Kranti Morcha demand Maratha reservation from OBC quota).

सभेत खालील ११ मागण्या करण्यात आल्या –

 

१) २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत सरकारने मराठा आरक्षण टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत. ५० टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण असले तरी कायदेशीरदृष्टया अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून SEBC आरक्षण टिकवावे. प्रशासकीय अधिकारी किंवा विधिज्ज्ञ आणि शासन स्थगिती उठवण्यात असमर्थ ठरले, तर OBC वर्गाचे उपवर्गीकरण करून न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार ५० टक्क्याच्या आत OBC समूहात समाविष्ट करून आरक्षण द्यावे.

२) कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी.

३) SEBC च्या २१८५ मराठा उमेदवारांना सरकारने तत्काळ न्याय द्यावा.

४) मराठा समाजातील उमेदवारांचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवल्याशिवाय राज्यात कोणतीही नोकरभरती करू नये.

५) EWS आरक्षणाच्या माध्यमातून चाललेली दिशाभूल थांबवा.

६) समांतर आरक्षणाच्या प्रशासकीय चुकीने अन्याय झालेल्या मराठा समाजातील महिला उमेदवारांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या.

७) सत्ताधारी आणि विरोधक यांनी मराठा आरक्षणाचे राजकारण न करता मराठा आरक्षणातील चुका दुरुस्त करून न्याय द्यावा.

८) सरकारी नोकरीमध्ये अनेक न्यायालयीन निर्णय आणि नियमावली, विविध शासन निर्णय याचे चुकीचे अर्थ लावण्यात आलेत. त्यामुळे राज्यातून बेरोजगार युवकांनी केलेल्या भरती पूर्व आरक्षण आणि अनुशेष संदर्भात आढावा घेण्याच्या मागणीवर शासनाने विचार करावा.

९) २५ जानेवारीनंतर मराठा समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला, तर तत्काळ संभाजीनगर येथे भव्य मेळावा घेऊन संपूर्ण राज्यात मेळावे घेऊन आंदोलन केले जाईल.

१०) औरंगाबादचे नामांतर करून तत्काळ “छत्रपती संभाजीनगर” करावे.

११) १९ फेब्रुवारी रोजी मराठा क्रांती मोर्चामार्फत संपूर्ण राज्यात शिवजयंती दिमाखात साजरी करण्यात येईल.

सोमवारी दिल्लीत वकिलांची बैठक

सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ११ जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.

नवीन महाराष्ट्र सदनामध्ये होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधिज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER