मराठी क्रांती मोर्चा आक्रमक; वडेट्टीवार यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी

Vijay Wadettiwar

पुणे :  सारथी संस्था आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्च्याने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘उद्या मराठा आरक्षणाची न्यायालयात सुनावणी आहे. निकाल विरोधात गेला तर ९ ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध पाळून रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. ’ असा इशारा पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून क्रांती मोर्च्याच्यावतीने देण्यात आला आहे. ‘राज्यातील तीन पक्षांच्या सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय होण्याची शक्यता आहे. ‘सारथी’बाबत एक समिती नेमली.

त्यानंतर अहवाल आला. परत दुसरी समिती नेमली. मात्र हा अहवाल समोर मांडला जात नाही. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून या खात्याचा कारभार काढून घ्यावा.’ अशी मागणीही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्च्याचे तुषार काकडे म्हणाले, मागील फडणवीस सरकारने आमच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या होत्या. विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करतोय.

सारथीची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. विजय वडेट्टीवार मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनावेळी जो शब्द दिला होता तो सरकारने पाळावा. याशिवाय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रखडले आहे. विजय वडेट्टीवार या खात्याला न्याय देऊ शकत नाहीत. सारथी संस्थेची छळवणूक सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भेदभाव केला जात आहे, असा आरोपही यावेळी केला. मराठा आरक्षणाबाबत उद्याच्या न्यायालयाने दिलेल्या निकालात काही दगाफटका झाला तर आम्ही सरकारला धडा शिकवू, मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याची जबाबदारी सरकारची असेल.

वडेट्टीवार यांनी याला राजकीय रंग देऊ नये, असा आक्रमक पवित्रा मराठा मोर्च्याने घेतला. दरम्यान, मराठा क्रांती मोर्च्याने विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘मी सारथीसाठी प्रामाणिक काम करतोय.

मी ओबीसी समाजातून आलेलो आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे असं वाटत असल्याने, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सारथीची जबाबदारी मराठा मंत्र्याकडे देण्याची विनंती करणार आहे.’ अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. सारथी संस्था बंद पडणार नाही हे मी आजही छातीठोकपणे सांगतो; पण यामागे काही राजकीय नेते या मंडळींची दिशाभूल करत आहेत.  त्यांची नावं योग्य वेळी जाहीर करेन, असं यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER