मराठा वसतिगृह : जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्याकडे सांगलीकरांचे लक्ष

Jayant Patil & Viswajit Kadam

सांगली : मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगलीत निघालेल्या मोर्चात त्यावेळी विद्यमान पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि कृषीराज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (Viswajit Kadam) सहभागी झाले होते. आता हे दोन्ही नेते सत्तेत आहेत. त्यांनी पाठपुरावा करून मराठा वसतीगृह जागेचा आणि इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे. या दोन्ही मंत्र्यांकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.

सांगलीत सर्वच समाजातील अर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी 1977 मध्ये राज्यात दहा अनुदानित वसतीगृहे सुरू झाली होती. त्यापैकी बुधगावचे वसतीगृह आहे. मात्र इमारत मोडकळीस आल्याने ते वसतीगृह शेतकरी शिक्षण मंडळाच्या भाड्याच्या जागेत स्थलांतरित झाले. शासनाची जागा विकण्यात आली. दुसऱ्या बाजूला सध्याच्या वसतीगृहाची जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ते वसतीगृह बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सर्वसामान्य मुलांसाठी हे वसतीगृह सुरू रहावे अशी मागणी आहे. मंत्री पाटील, डॉ. कदम लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी येथील गंजीखान्याची साडेतीन एकर जागा देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र दोन वषारंपासून त्या प्रस्तावाची फाईल मंत्रालयात धूळ खात पडून आहे. सत्ता बदलानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या प्रस्तावाकडे ढुंकूनही पाहिले नाही.

मराठा समाजाच्या आंदोलनानंतर तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यात समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी प्रत्येक वसतीगृहास पाच कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या नावे तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने मंत्रालयात पाठवला होता. तत्कालीन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनीही वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. आता सत्तेत असलेल्या म्हणती जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांनी याप्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER