मराठा समाजातीलच नेते, शिक्षण आणि सहकार सम्राट यांच्यामुळे मराठा समाज भरडला : राजेंद्र कोंढरे

Rajendra Kondhare

कोल्हापूर : मराठा समाजाचा (Maratha Community) ओबीसीमध्ये (OBC) समावेश झाला असून, आम्ही राजकीय आरक्षण नाकारले आहे. हे ओबीसी नेत्यांनी लक्षात घ्यावे. राज्यात आरक्षणाची चोरी होत आहे. शिवाय मराठा समाजातीलच राजकीय नेते, शिक्षण व सहकारसम्राटांमुळेच मराठा समाज भरडला जात आहे. मतांच्या भीतीपोटी ह्या त्रुटी दूर केल्या जात नसल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhare) यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.

कोंढरे म्हणाले, मराठा समाजातील गर्भश्रीमंत आणि मध्यमवर्गीयांची समाजातील तळाच्या घटकांशी नाळ तुटली आहे. त्यामुळेच मराठा समाजाला मदतीसाठी हात पसरावे लागत आहे. आरक्षणाची टक्केवारी लावताना अनेक त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना संधी मिळत नसल्याने, भविष्यात संघर्ष होणार आहे. यासाठी शासनाने यात पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. मराठा समजतील युवकांनी केवळ एमपीएससी हेच स्वप्न न पाहता, रोजगाराच्या इतरही संधीकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. यासाठी मराठा समाजातील निवृत्त कर्मचारी अधिकारी, अभियंते, संशोधक उद्योजक अशा घटकांनी आपल्या अनुभवाचा फायदा समाजातील गरजूंना द्यावा, भविष्यात हाताला रोजगार नसलेली पिढी दगड हातात घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभी राहण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

मराठा समाजातल्या राजकारण्यांच्या ‘प्रो मराठा’ वागण्याने आणि मोठ्या चेहऱ्याकडे बघून प्रश्न नाकारले जात आहेत. कुंकू असून विधवा अशी समाजाची अवस्था झाली आहे. आरोप त्यांनी यावेळी केला. शासनाचा किमान कौशल्य शिक्षण विभाग पुर्ण क्षमतेने सुरू झाला पाहिजे. शासनाने औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या पाहिजेत. सारथी संस्थेचा कार्यभार अजित पवार यांनी स्वीकारल्यानंतर कामात गती आली. त्यातुलनेत आवश्यक मनुष्यबळ नाही. कोल्हापूरला सारथीचे उपकेंद्र देण्याची मागणी करताना, छत्रपतींच्या वारसाबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. यावेळी वसंत मुळिक, डॉ. संदिप पाटील, हर्षल सुर्वे, शैलजा साळोखे, अवधुत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER