मराठा समाज आक्रमक : सोलापूर बंदची हाक; रस्त्यावर टायर जाळून आंदोलनाला सुरुवात

Maratha Community Protest - Solapur

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज (Maratha Community) आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सोमवारी सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी सोलापूर (Solapur) बंदची हाक दिली आहे. या बंदला सकाळपासूनच सुरुवात झाली. माढ्यात आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. शहरात सोलापूर शहर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षण स्थिगितीविरोधात आज बंद पुकारण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोरदेखील आंदोलनं करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात माढामध्ये उग्र स्वरूपाची निदर्शने करून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शहरात सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे (BJP) आमदार विजयकुमार देशमुख (Vijay Kumar Deshmukh) यांच्या घरासमोर आंदोलनासाठी कार्यकर्ते एकत्रित आले आहेत. शहरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटादेखील तैनात करण्यात आलेला आहे. मराठा आरक्षण स्थगितीप्रकरणी आज पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदमध्ये आंदोलकांनी पंढरपूर-पुणे महामार्ग रोखून धरला. माढ्यात रस्त्यावर टायर जाळल्यानंतर वेळापूरच्या पुढे असणाऱ्या निमगाव पाटीजवळ मराठा तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता अडवला.

‘एक मराठा लाख मराठा’च्या जोरदार घोषणा देत दोन्ही बाजूंची वाहतूक आंदोलकांनी रोखून धरली. या बंदकाळात एसटी बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार घडू शकतात. तसे प्रकार घडू नयेत म्हणून २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजतापासून २१ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एसटी बससेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. माढ्यातील तरुणांनी भल्या पहाटेच ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी माढा शहर दणाणून सोडलं आहे. त्यामुळे जिल्हाभरात आज दिवसभरात कशा पद्धतीने हे आंदोलन पार पडतेय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाज आंदोलन करणार आहे. कोल्हापुरातही आज पुन्हा मराठा समाजाचे आंदोलन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER