पुरुषांच्या टेनिसमध्ये बऱ्याच गोष्टी खूप वर्षांनी घडत आहेत

men tennis

कोरोनाच्या कृपेने फेडरर, वावरिंका, नदालसह बऱ्याच खेळाडूंची अनुपस्थिती, मरेचा पराभव आणि नोव्हाक जोकोवीचला झालेली अपात्रतेची शिक्षा… यामुळे टेनिस इतिहासात बऱ्याच वर्षांत घडल्या नाहीत अशा गोष्टी यंदाच्या यूएस ओपन टेनिसमध्ये (US open tennis) घडत आहेत. त्यापैकी सर्वांत उल्लेखनीय म्हणजे टेनिसमध्ये १९६८ मध्ये खुले सामने सुरू झाले तेव्हापासून केवळ दुसऱ्यांदाच असे घडले आहे की, उपांत्य पूर्व फेरीमध्ये (quarter finals) पोहचलेल्या खेळाडूंमध्ये एकही ग्रँड स्लॅम (no former winner) स्पर्धा विजेता नाही.

यंदा बोर्ना कोरीक (Borna Coric) , ऍलेक्झांडर झ्वेरेव्ह (Alexander Zverev) , पाब्लो कॅरेनो बस्टा, डेनिस शापोव्हालोव्ह, आंद्रे रुब्लेव्ह, दानिल मेद्वेदेव्ह, अॅलेक्स डी मिनौर व डॉमिनिक थिएम यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे पण यांच्यापैकी एकानेही आधी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेली नाही. याआधी असे फक्त एकदाच घडले आहे २००३ च्या विम्बल्डनमध्ये. त्यावेळी योनास ब्योर्कमन, अँडी रॉडीक, रॉजर फेडरर, जेंग शाल्केन, टिम हेनमन, सेबॕस्टियन ग्रोस्जियन, ऍलेक्झांडर पाॕप व मार्क फिलीपौसीस यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती; पण यापैकी एकाच्याही नावावर त्यावेळी ग्रँड स्लॅम विजेतेपद लागलेले नव्हते.

दुसरा विक्रम असा होईल की, १९९० नंतर जन्मलेला खेळाडू प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकेल. नदाल-फेडरर-जोकोवीच-मरे यांच्या वर्चस्वाने आतापर्यंत गेल्या ६३ ग्रँड स्लॅम स्पर्धांत विजेते १९८० च्या दशकातील जन्मलेलेच होते. एवढेच नाही तर उपांत्यपूर्व फेरी गाठलेले आठही खेळाडू तिशीच्या आतील आहेत. सहा तर २४ च्या आतील आहेत. केवळ डाॕमीनिक थिएम (वय २७) व पाब्लो बस्टा (वय २९) हे अधिक वयाचे आहेत.

ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये २०१५ नंतर प्रथमच आणि यूएस ओपनमध्ये २०१० नंतर प्रथमच एवढ्या संख्येने कमी वयाचे खेळाडू पुढे आले आहेत. गंमत म्हणजे यंदाच महिला एकेरीत मात्र सेरेना विल्यम्स (३८ वर्षे) व स्वेताना पिरोन्कोव्हा (३३ वर्षे) या दोन खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत पोहचल्या आहेत. त्यांचे वय पुरुष खेळाडूंपेक्षाही अधिक आहे. हे नेहमीपेक्षा अगदी उलट चित्र पहिल्यांदाच बघायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER