विदर्भातील अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात, जयंत पाटलांचे मोठे विधान

Jayant Patil

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्यासाठी विदर्भातून अनेकांनी संपर्क केल्याचे मोठे विधान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे. एकनाख खडसे (Eknath Khadse) यांच्यानंतर अनेक नेते संपर्कात आले. विदर्भातून अनेक जण संपर्कात आहेत. परंतु योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत नाव सांगणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या या विधानाने इतर पक्षांची चिंता वाढली आहे. पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील राज्यभर दौरा करत आहेत. सध्या ते विदर्भात आहेत.

संपर्कात असलेल्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाबाबत जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस चांगली वाटते म्हणून लोकप्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ज्यांना जनता आपले मानतात अश्याना पक्षात प्रवेश देत आहोत. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानंतर बरेच नेते संपर्कात आले. सकाळी एक नेता भेटून गेला. विदर्भातील अनेक जण संपर्कात आहेत. परंतु निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत नाव सांगणार नाही. विदर्भ म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा. आता भाजपचे लोकप्रतिनिधी विदर्भात सर्वात जास्त दिसतात. त्यामुळे राष्ट्रवादीने विदर्भात आपली ताकद वाढवण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. नागपूर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. नागपूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पहिला चॉईस झाला पाहिजे असे प्रयत्न करा, अशी सूचनाही जयंत पाटील यांनी केली

दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाकडे राष्ट्रवादीचं लक्ष आहे. या मतदारसंघाविषयी कार्यकर्ते आग्रही असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. पुढच्या निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ मागणार का असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला अजून साडेतीन वर्षे शिल्लक आहेत. आमचं अस्तित्त्व कुठे चांगलं आहे, त्याप्रमाणे आम्ही जागेसाठी आग्रह करु. नागपूर शहरात एक किंवा दोन जागा लढल्या पाहिजे, ही माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांची मागणी आहे. नागपूर शहरात एक जागा मिळावी ही आमची आधीची मागणी होती. अगदीच काही नाहीतर दक्षिण- पश्चिम जागा द्यावी. आज आढावा घेताना जाणवलं की, त्या मतदारसंघात आमचे कार्यकर्त्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. प्रयत्न केला तर पक्षाला अधिक मोठं करु शकतो. दक्षिण-पश्चिम, पूर्व कोणत्याही मतदारसंघात आम्ही यशस्वी होऊ शकतो, असं जयंत पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER