कृषी कायदे, इंधन दरवाढीविरोधात नाना पटोलेंसह अनेक मंत्रीही उपोषणाला बसणार!

Nana Patole - Maharastra Today

मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायदे आणि इंधन दरवाढीविरोधात शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (२६ मार्च) ला भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला कांग्रेसने पाठिंबा दिला आहे. भारत बंदमध्ये सहभागी होत काँग्रेस पक्षाचे नेते राज्यभर उपोषण करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यासह अन्य नेते आणि मंत्रीही मंत्रालयासमोरील सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत उपोषण करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

राज्यातील सर्व जिल्हा, तालुका, काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या उपोषणात सहभागी होणार आहेत. औरंगाबादेत शिवाजीराव मोघे, ठाण्यात माजी मंत्री नसीम खान, नागपुरात चंद्रकांत हांडोरे, पुण्यात बसवराज पाटील, नाशिकमध्ये आमदार प्रणिती शिंदे तर अमरावतीत आमदार कुणाल पाटील हे पदाधिकारीसह कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत.

केंद्र सरकारवर आरोप

“शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे काळे कृषी कायदे रद्द करावेत, या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील तीन महिन्यांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनात आतापर्यंत ३०० हून जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही हे कृषी कायदे मोदी सरकारने रद्द केले नाहीत. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. यामुळे गोरगरीब जनता, कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, मोदी सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.” असा आरोप काँग्रेसने केला आहे.

त्याचबरोबर, “पेट्रोल-डिझेल आणि गॅसवर भरमसाठ कर लावून सरकार दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ८५० रुपये झाला आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत.” मोदी सरकारच्या या मनमानी व हुकुमशाहीचा विरोधकरून उपोषण केला जाणार, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

अकोला, वाशीम जिल्ह्याची आढावा बैठक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज अकोला आणि वाशीम जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक गांधी भवन येथे पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी उज्ज्वल करण्यासाठी पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार अमित झनक, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER