बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांना मोदींसह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

PM Modi-Ramrao Maharaj

मुंबई : श्री रामराव बापू महाराजजी (Ramrao Maharaj) यांच्या सेवाकार्य आणि अध्यात्मिक ज्ञानासाठी सर्वांच्या स्मरणात राहतील. मानवी दु:ख दूर करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. काही महिन्यांपूर्वी त्यांना भेटण्याचा मान मला मिळाला होता. या दु:खद घटनेत मी त्यांच्या अनुयायींसोबत आहे असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केले.

देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे काल (३० ऑक्टोबर) रात्री साडे अकराच्या सुमाराला दीर्घ आजाराने मुंबईतील लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. संत रामराव महाराज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे प्रमुख होते. रामराव महाराज यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांना १७ ऑक्टोबरला उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा निधनाने बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे.

१९४८ मध्ये पोहरादेवी येथील गादीवर बसल्यानंतर रामराव महाराजांनी अन्नत्याग केला. फक्त कडूनिंब, दूध आणि फळांचे सेवन करत होते. गेल्या काही महिन्यांपासून दूध घेतानाही त्यांना त्रास जाणवत होता. ते फक्त कडूनिंब आणि ज्यूस घेत होते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यासारख्या थोर विभूतीच्या निधनाने केवळ बंजारा समाजाचेच नव्हे तर सर्व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान, धर्मगुरू डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनाने खूप दुःख झाले. डॉ. रामरावजी महाराज यांनी संत सेवालाल महाराज यांचा वारसा चालवताना समाजातील अनिष्ट प्रथांवर नेहमीच प्रहार केला आणि जनजागृतीचे मोठे कार्य केले. श्री पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा, तसेच राज्यातील तांड्यांचा विकास व्हावा, यासाठी ते आग्रही होते. प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. व्यसनापासून दूर राहावे, शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. श्रद्धास्थान, धर्मगुरु म्हणून त्यांचा अनुयायांना मोठा आधार होता. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मासह, समाज सुधारणेच्या क्षेत्रातील मार्गदर्शक छत्र हरपले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. डॉ. रामरावजी महाराज यांना त्रिवार वंदन.

अशोक चव्हाण (Ashok Chavan)

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही ट्वीट करत म्हटलं, बंजारा समाजाचे धर्मगुरू, संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनामुळे थोर समाजसुधारक आणि अध्यात्मिक मार्गदर्शक हरपले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे.

डॉ. रामरावजी महाराज यांचे चव्हाण कुटुंबाशी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून जिव्हाळ्याचे नाते होते. ते आमचे मार्गदर्शक होते; त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी होता. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

धनंजय मुंडे (Dhanany Munde)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्वीट केले – पोहरादेवी संस्थानचे मठाधिपती, बंजारा समाजाचे ऊर्जास्त्रोत धर्मगुरु डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. मला त्यांचे सानिध्य, आशीर्वाद लाभले हे माझं भाग्यच! डॉ. रामराव बापू महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)

संत डॉ. रामराव महाराजांच्या निधनाने एक महान तपस्वी काळाच्या पडद्याआड

बंजारा समाजाचे धर्मगुरू, पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे मठाधिपती संत डॉ. रामराव महाराज हे देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान होते. बंजारा समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. आपल्या प्रवचनातून त्यांनी रुढीवादी, अशिक्षित बंजारा समाजामध्ये शिक्षणाप्रती जागृती निर्माण केली, समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या निधनाने एक महान तपस्वी काळाच्या पडद्याआड गेले, अशा शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER