भाजपाला ट्रोल करण्याच्या नादात गृहमंत्र्यांसह अनेकांची फजिती

Anil Deshmukh

मुंबई : भाजपाच्या खासदार रक्षा खडसे त्यांच्याबाबत भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे ट्विट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी केल्यांनतर या मुद्द्यावर गदारोळ सुरू झाला. मुद्दा भाजपाविरुद्ध असल्याने गृहमंत्र्यांनीही ताबडतोब दखल घेऊन भाजपावर कारवाई करण्याची घोषणा केली; पण पडताळणीत लक्षात आले की, हे सर्व गुगलच्या भाषांतराच्या घोळामुळे झाले आणि यावर उसळणाऱ्यांना याचे ज्ञान नसल्याने ते बडबडत गेले !

ट्विट करून सतत भाजपाच्या विरोधात पोस्ट करून ट्रोल करणाऱ्या स्वाती चतुर्वेदी यांनी बुधवारी एक ट्विट शेअर केले. ज्यात भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह शब्द असल्याचे म्हटले होते. स्वयंघोषित पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी याबाबत जास्त माहिती न घेता तो फोटो शेअर करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पीएमओ इंडिया यांना टॅग करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

स्वाती चतुर्वेदी यांच्या या ट्विटची ‘तत्परतेने’ दखल घेत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीही भाजपाला कारवाईचा इशारा दिला. स्वाती चतुर्वेदी यांचे ट्विट शेअर करताना गृहमंत्री म्हणाले की, महिलांविषयीचा हा अनादर सरकार खपवून घेणार नाही. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

गुगल ‘ट्रान्सलेट’ कसे काम करते हे जर त्यांना माहीत असते तर त्यांचेच हसे झाले नसते. टोकाचा भाजपाविरोध आणि टीकेची तीव्र इच्छा यामुळे त्यांनी यात थेट भाजपाचाच दोष असल्याचे सांगून टाकले.

स्वाती चतुर्वेदी
स्वाती चतुर्वेदी या स्वत: पत्रकार असल्याचे सांगतात. त्यांना इंटरनेटबद्दल चांगली माहिती नाही, हे त्यांनी याआधीही सिद्ध केले आहे. नुकताच त्यांनी दावा केला होता की, त्यांनी गुगलवर मोदींच्या लग्नाचे फोटो सर्च केले होते तेव्हा त्यांना तशा इमेज सर्चमध्ये सापडल्या होत्या! परंतु त्यांनी हा विचार केला नाही की, पंतप्रधान मोदी स्वत: एखाद्या लग्नात हजर राहिलेल्या एखाद्या लग्नसोहळ‌्याचे फोटो यात येऊ शकतात. गुगलने दाखवलेले फोटो मोदी यांच्या लग्नाचेच आहेत, असा समज करून या बाईंनी गोंधळ घातला. नेटीजन्सने ही चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा त्यांनी याचे खापर गुगलवरच फोडले होते!

गोंधळ
गुगल ट्रान्सलेटमुळे हा वाद निर्माण झाला. भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर वाचकांना सर्व कंटेंट हिंदी आणि इंग्रजी भाषांत पाहण्याचा पर्याय आहे. एखाद्याला वेबसाईटचे कंटेंट हिंदीमध्ये पाहायचे असल्यास गुगल ट्रान्सलेटवरून ते भाषांतरित करता येते.

या प्रकरणात गुगल ट्रान्सलेशनने ‘रावेर’ या शब्दाचे चुकीचे भाषांतर केल्याचे दिसते. रावेर हे स्थळाचे नाव न समजता गुगलने हिंदी शब्द समजून त्याचे ‘समलैंगिक’ असे भाषांतर केले. या गुगल ट्रान्सलेशनमुळे झालेल्या चुकीचे खापर भाजपावर फोडण्यात काहीही अर्थ नाही हे सर्व लक्षात आल्यानंतर यावर बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER