पंकजाच काय, राज्यातील अनेक बडे नेते सेनेच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut-Pankaja Munde.jpg

नाशिक : आज भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजप गायब असं चित्र दिसून आलं असून, त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजाच काय राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात आणि वाटेवर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

राऊत म्हणाले की, पंकजा मुंडेंबाबत तुम्हाला १२ डिसेंबरलाच सगळं स्पष्ट होईल. पंकजाच काय शिवसेनेच्या वाटेवर अनेक मोठी लोक आहेत. राज्यात आता आमचं सरकार स्थापन झालं आहे, असं सांगताना महाराष्ट्राची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचे ते म्हणाले. तसेच बुलेट ट्रेनचं ओझं आमच्यावर नको अशा शब्दांत त्यांनी या प्रकल्पाला स्थगितीच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला दुजोरा दिला. तसेचआरेप्रमाणे नाणार प्रकल्पात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही संजय राऊत म्हणाले. भाजपा खासदार अनंत हेगडे यांच्या दाव्यावर फडणवीस नाही तर मुख्य सचिव खुलासा करतील, असेही ते म्हणाले.

पंकजा मुंडेंकडून शिवसेना प्रवेशाचे संकेत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

राज्यातील खाते वाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मंत्रीमंडळाचा विस्तार कधीही होऊ शकतो. खातेवाटपावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद असल्याच्या प्रश्नावर मी त्यांच्या बैठकांना उपस्थित असतो त्यामुळे असं काहीही नाही. गृहमंत्रीपद शिवसेना की राष्ट्रवादी आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा याबाबत सर्वस्वी उद्धव ठाकरे यांचा अधिकार आहे. असे त्यांनी सांगितले.

राहुल बजाज यांनी केंद्रावर नुकतीच टीका केली होती यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “मी राहुल बजाज यांना ओळखतो. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते. त्यामुळे राहुल बजाज यांच्या वक्तव्याने कोणालाही दुःख होण्याचे कारण नाही. त्यांना ते बोलणाचा अधिकार आहे. सध्या देशातील उद्योगपतींना जे वाटतयं तेच त्यांनी नमूद केलं.” असेही राऊत यावेळी म्हणाले.