मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाला नवे वळण; एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल

Manshuk hiren

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. करंट तपास करणाऱ्या एटीएसने या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र एटीएसनं हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक पोलीस स्टेशन मुंबई यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणी गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या परिसरात एटीएसकडून पुन्हा एकदा तपास केला जाणार असून घटनेचे नाट्यरूपांतर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

गृह विभाग,महाराष्ट्र शासन यांचे आदेशानुसार ठाणे शहर पोलीस यांच्याकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्युप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून आपल्याकडे घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. विमला मनसुख हिरेन यांच्या  फिर्यादीवरून दहशतवाद विरोधी पथक पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसुख हिरेन मृत्युप्रकरणातील एक गूढ संपत नाही तोच दुसरं गूढ निर्माण होत असल्याने तपास यंत्रणाही चक्रावून गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन शोधून काढले आहे. त्यानुसार बुधवारी रात्री साडेदहा वाजता ते वसईतील एका गावात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हिरेन वसईत कोणत्या गावात गेले? कशासाठी गेले होते? तिथे ते कुणाला भेटले? भेटलेल्या व्यक्तींशी काय चर्चा केली? असे सवाल केले जात असून याबाबतचं गूढ आणखीनच वाढलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या दिशेनेही तपास सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER