मानसी बनणार जोधा

mansi Naik

सध्या तरी अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) तिच्या लग्नाच्या तयारीत दंग झालेली असतानाच आता मानसी जोधा बनणार आहे या बातमीने तिच्या चाहत्यांचे कान टवकारले आहेत. जोधा-अकबर या सिनेमाचे मराठी व्हर्जन तर येणार आहे का …आणि या सिनेमामध्ये मानसी जोधाच्या भूमिकेत दिसणार आहे का अशा अनेक प्रश्नांना देखील तिच्या फॅन फॉलोअर्स मध्ये उधाण आले आहे. पण असं काहीच होणार नसून मानसी जोधा बनणार हे खरं आहे पण सिनेमाच्या किंवा मालिकेच्या पडद्यावर नव्हे तर खऱ्याखुऱ्या आयुष्यात लग्नाच्या बोहल्यावर मानसी जोधा लूकमध्ये दिसणार आहे. त्यामुळे सध्या ती जोधाच्या काळातील दागिन्यांची आणि पेहरावाची खरेदी करण्यात रंगून गेली आहे.

मराठी सेलिब्रिटींच्या लग्नाचा धूमधडाका सुरू आहे हे तर आपण पाहतच आहोत. अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून मराठी इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केलेल्या मानसीने तिचा प्रियकर प्रदीप खरेरा याच्या सोबत विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीप आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. गेल्या महिन्याभरापासून मानसीच्या लग्नाच्या तयारीचे फोटो ती शेअर करत आहे आणि तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाच्या तयारीचा थाट भलताच आवडला आहे. काही दिवसांपूर्वीच मानसीने प्री वेडिंग शूट दणक्यात केले होते तसेच तिच्या मैत्रिणींनीदेखील तिच्यासाठी खास बॅचलर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीतही तिने खूप सारी धमाल केली आणि त्याचे फोटो चाहत्यांना तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवले होते. सध्या मानसी खूप खुश आहे.

मानसी सांगते, लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप अविस्मरणीय क्षण असतो आणि हा दिवस माझ्या आणि प्रदीपच्या लक्षात राहावा असा मला वाटतं. ऐश्वर्या ही माझी सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे आणि तिचा जोधा-अकबर या सिनेमातला लूक मी विसरु शकलेले नाही. जोधा-अकबर मध्ये पारंपारिक दागिन्यांमध्ये आपण तिला पाहिले आहे आणि लग्न म्हटले की दागिन्यांचा साज नेहमीच चांगला दिसतो. माझे एक स्वप्न होतं की मी जेव्हा लग्न करेन तेव्हा माझ्या आवडत्या अभिनेत्रीचा म्हणजेच ऐश्वर्याचा जोधा-अकबर या सिनेमातला जोधाचा लूक करूनच लग्न करीन. त्यामुळे माझे स्वप्न देखील पूर्ण होत आहे याचा मला आनंद आहे. १९ जानेवारीला मानसी तिचा प्रियकर प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे तिचे काउंटडाऊन सुरु झाले आहे.

अभिनय, नृत्य, जाहिरात, मॉडेलिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मानसी नाईक हिने तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या गोजिरवाण्या घरात या मालिकेपासून मानसी नाईकने तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या जाहीर कार्यक्रमात तिला डान्सच्या ऑफर येऊ लागल्या. मानसीचा डान्स पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच आतुर असतात. ढोलकीच्या तालावर या रियालिटी शोमध्ये मानसीच्या नृत्याची जादू तिच्या चाहत्यांनी अनुभवली होती. महेश टिळेकर यांच्या मराठी तारका या कार्यक्रमात देखील मानसी नाईक हिने तिच्या नृत्य अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

काही महिन्यापूर्वीच मानसी आणि प्रदीप यांचा साखरपुडा झाला होता. त्या साखरपुड्याचे फोटो मानसीने तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. मानसीने काही सिनेमातही काम केले आहे मात्र सध्या मानसी अभिनेत्रीपेक्षा उत्तम डान्सर म्हणून लोकप्रिय आहे. मानसीने डान्स केलेली, बघतोय रिक्षावाला , मस्त चाललय आमचं ही गाणी तुफान लोकप्रिय झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER