मानसी शोधणार ..त्या रात्री काय घडलं?

टीव्ही सिरीयल (TV serial) म्हटलं की वेगवेगळे ट्रेंड कथेच्या माध्यमातून मालिकांमध्ये येत असतात. सध्या टीव्ही इंडस्ट्रीमध्ये फॅमिली ड्रामा हा ट्रेंड सुरू आहे. दोन, तीन भाऊ , त्यांच्या बायका, या सासू-सासरे असं भरलेलं घर आणि मग यानिमित्ताने मालिकेच्या कथेत येणारी नाट्यमय वळणं बघायला प्रेक्षकांना आवडतात तसंच सध्या पौराणिक मालिकांचाही ट्रेंड आहे.

अनेक वाहिन्यांवर देवदेवतांच्या मालिका दाखवल्या जात आहेत आणि त्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. अशाच वेगवेगळ्या मालिकांच्या मांदियाळीत अभिनेत्री मानसी साळवी (Mansi Salvi) रहस्यमय मालिकेतून ऑनस्क्रीन येणार आहे. मानसी ही तेरा वर्षांनी पुनरागमन करणार आहे. मानसी साळवी म्हटलं की आजही असंभव मालिकेतील शुभ्रा अनेकांना आठवते. आईशप्पथ सिनेमामध्ये मानसीवर चित्रीत झालेलं मन पाखरू हे गाणं अनेक मुलींनी त्यांच्या कॉलेजजीवनाच्या काळात गॅदरिंगला म्हटले असेल. हीच मानसी आता पोलीस इन्स्पेक्टरच्या रूपात एक धडाडीची भूमिका घेऊन तिच्या चाहत्यांसाठी छोट्या पडद्यावर दाखल झाली आहे. रेवती बोरकर या व्यक्तिरेखेच्या रूपाने ती ऑनस्क्रीन एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हत्येचा तपास करणार आहे. त्या रात्री काय घडलं असं या नव्या मालिकेचे नाव असून तिचे चाहते तिला पोलिसाच्या भूमिकेत पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत.

मानसी साळवी ही मराठी मुलगी असली तरी तिने आत्तापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. यामध्ये, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा, कोई अपना सा, या जवळपास पंधरा वर्षांपूर्वीच्या मालिका आजही आठवतात त्या मानसीच्या अभिनयामुळे. खरेतर मानसीदेखील या गोष्टीचे आभार मानते. ती म्हणते, एखादी मालिका ऑफएअर गेल्यानंतर आणि पुढे नवीन मालिका सतत येत असल्यामुळे कलाकार लक्षात राहतातच असे नाही. पण मला माझ्या जुन्या मालिकांच्या नावाने, त्यातील व्यक्तीरेखेच्या नावाने आजही ओळखतात याचा खरंच खूप आनंद वाटतो.

मानसीच्या मराठी मालिकाही खूप गाजल्या होत्या. ज्यामध्ये, सौदामिनी नुपुर, असंभव या मालिकांचा समावेश होता. असंभव या मालिकेमध्ये मानसीने शुभ्रा ही भूमिका केली होती. त्यामध्ये उमेश कामत तिचा नायक होता. पुनर्जन्मावर आधारित असलेली ही मालिका रंजक वळणावर आली असताना मानसीने काही कारणाने ही मालिका सोडली होती आणि तिच्या जागी उर्मिला कोठारेची रिप्लेसमेंट झाली होती. इतकी चांगली मालिका मानसीने मध्येच का सोडली याची चर्चा त्या काळात खूप रंगली होती. मात्र त्याच दरम्यान मानसी आणि तिचा नवरा हेमंत प्रभू यांच्यातील मतभेद टोकाला गेले होते आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाची गाठ कायमची सोडण्याचा निर्णय घेतला होता. मानसीच्या आयुष्यामध्ये आलेले हे वळण तिच्यासाठी त्रासदायक होते. तिला ओमिषा नावाची एक मुलगी आहे आणि तिच्या संगोपनासाठी गेल्या 13 वर्षापासून मानसीने अभिनयापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. मानसीसारखी चांगली अभिनेत्री कुठे गायब झाली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता पण आता सगळ्या प्रश्नाची उत्तर देत मानसी नव्या दमाने पुन्हा तिच्या आवडत्या मालिका या माध्यमामध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मानसी सांगते की प्रत्येक अभिनेत्रीला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका कराव्या असं नेहमी वाटतं. त्यातही प्रत्येक अभिनेत्रीचा असा एक ड्रीम रोल असतो. मलाही नेहमी वाटायचं की, पोलीस इन्स्पेक्टर यांचं आयुष्य किती वेगळे असते. त्यांना किती आव्हानांना सामोरे जात त्यांचे कर्तृत्व सिद्ध करायचं असतं. लहानपणी मला पोलिसांना बघितले की, त्यातही महिला पोलीसांना पहिले की कौतुक वाटायचं. त्यानंतर मी जेव्हा अभिनेत्री म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मालिकांमधून भूमिका केल्या. पोलीसची भूमिका हा माझा ड्रीम रोल आहे. याचा खूप आनंद होत आहे की, तेरा वर्षांनी जेव्हा मी माझ्या आवडत्या क्षेत्रांमध्ये पुनरागमन केलं तेव्हा पोलिस इन्स्पेक्टर ही माझ्या मनातील भूमिका करायला मिळत असल्याचा मला खरंच खूप आनंद होत आहे.

आईशप्पथ सिनेमामध्ये मानसीने रीमा लागू यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. सिंगल मदर हा विषय या सिनेमातून मांडला होता. वैयक्तिक आयुष्यातदेखील हेमंत प्रभू या दिग्दर्शकासोबत मानसीने लग्न केलं. मात्र मानसी आणि हेमंत यांचे वैवाहिक नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर मुलीची जबाबदारी मानसीवर आली. मधल्या दहा-बारा वर्षांमध्ये संपूर्ण लक्ष मानसीने तिच्या मुलीच्या संगोपनावर दिल्यामुळेच तिने तिच्या अभिनयाच्या स्वप्नाला थोडसं बाजूला केलं. आईशप्पथ सिनेमाप्रमाणे मानसीने एकल पालकत्व काय असतं हे अनुभवले. आता ती नव्या दमाने काम करण्यासाठी तयार झाली आहे. नवी भूमिका साकारण्यासाठी मानसीने काही विशेष तयारी देखील केली आहे. त्यामध्ये तिच्या परिचयातील महिला पोलिस अधिकाऱ्यांची देहबोली, त्यांची बोलण्याची पद्धत हे सगळं आत्मसात केलं. एके काळी अशा रहस्यमय मालिका खूप लोकप्रिय होत्या. लोकांना नेहमीच एखाद्या गुन्ह्याचा तपास वाचायला, पाहायला आवडत असते. तशाच पद्धतीची ही मालिका लवकर येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री मानसी अभिनय करताना दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER