“नृत्य गायनी, मने हर्षिली !”

नृत्य गायनी

रंगमंचावरचा पडदा (Stage Shows) वर गेला आणि एक सारख्या वेषातील अनेक नर्तिका समोर आल्या. आपल्या पदन्यासाने त्यांनी प्रत्येकाला मोहिनी घातली. प्रत्येकजणच उत्तम सादरीकरण करत होती. पण कार्यक्रमाची रंगत वाढली ती सर्व नर्तिकानी एकत्र येऊन साकारलेल्या अत्युत्तम सादरीकरणामुळे! अगदी डोळ्याचे पारणे फिटले.

खरे बघता एकूणच निसर्गातच सर्वत्र सूर्, लय, ताल, नाद भरलेला आहे. हो ना ?एखादी लाकडाची मोळी घेऊन जाणारी किंवा डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाणारी ग्राम कन्या बघा ना. एक सुंदर लय असते त्या पदन्यासात. तसेच पावसाच्या धारांचे तांडव असो, त्यांचे मोहक नर्तन मनावर एक दडपणही आणते. तीच गोष्ट सुरांची. ते निसर्गात ठाई ठाई आढळते. पक्ष्यांचा कलरव, गाईंच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज, झऱ्याच्या पाण्याचा खळखळाट, वार्‍याची सळसळ अगदी धुणे धुतांना स्त्रिया धुणे आपटतात, त्यावेळी सुद्धा एक विशिष्ट स्वर त्या काढतात एकूण हे नाद, लय, सुर अगदी आपल्या जगण्याचा भाग आहेत.

नृत्यकला ही एक व्यक्तीही सादर करू शकते. पण ती जेव्हा समूह नृत्य करते तेव्हा तिला अनेक बाबींवर लक्ष द्यावं लागतं, बदल करावे लागतात .सांघिक भावनेचं बाळकडू इथे मिळते. ‘टीम वर्क इज लेस ऑफ मी अँड मोर ऑफ अस.’ याचं भान येतं. मनुष्य समूहाने राहणारा सामाजिक प्राणी आहे. एकमेकांबरोबर मैत्री, सुख दुःख वाटून घेणारी वृत्ती, “नृत्य ची आचार – नृत्यची विचार “यातून विकसित होते. इतर सदस्यांसोबत चढाओढ, स्पर्धा, कुरघोडी केली तर त्याचा दुष्परिणाम नृत्याच्या सादरीकरणावर दिसून येतो. म्हणून एकमेकांचे दोष लपवून समान गुण कसे अधोरेखित करता येतील याकडे लक्ष द्यावे लागते. माझ्या मुलाचा एक अनुभव शेअर करते. त्याने नाटकात काम करायला नुकतीच सुरुवात केली होती .त्याचे नाटक बघायला मी गेले. रोल छोटासाच होता पण मला मात्र त्याला अस स्टेजवर काम करताना बघितल्यावर खूप छान वाटलं आणि तो स्टेजवर विशेष उठून दिसत होता, स्मार्ट दिसत होता असही वाटलं. (वेड्या आईची वेडी माया असेल कदाचित) नंतर त्याला माझी प्रतिक्रिया सांगितल्यावर तो म्हणाला, “म्हणजे माझं काम चांगलं नाही झालं आई! इतर लोकांनी मुख्य कथानक आणि आणि मुख्य कलाकार यांच्यावर वरचढ व्हायचं नसतं आणि तुला तुझा मुलगा म्हणून असं वाटतंय, बाकी काही नाही. समूहात जगण्याचं केवढं मोठं नवीन तत्व नाट्यकलेने त्याला दिलं होतं!

शारीरिक मानसिक विकासाबरोबरच बौद्धिक विकासासाठी नृत्य कलेचा वापर होतो हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. वृद्धापकाळातील मेंदूची झीज रोखण्यासाठी, कंप वाताच्या, अर्धांगवायु, बुद्धी भ्रंशाच्या रुग्णांना सुध्दा नृत्यकलेचा उपयोग होत असतो. लहान मुलांमधील मेंदूचे विकार, स्वमग्नता, मतिमंदत्व असणाऱ्या मुलांना नृत्याचे धडे दिले जातात. “डान्स युवर वे टू हेलदीयर अँड हॅपियर लाईफ अहेड !”असेच म्हणावे लागते.

संगीतकला ही याला अपवाद नाही. हे संगीत आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला वेगवेगळ्या रूपात भेटत असते आणि भावतेही ! अंगाई गीत, बडबड गीते, यातून गाण्याच्या प्रवासाला सुरुवात होते. भोंडल्याची गाणी, मंगळागौरीची गाणी आपल्या जीवनाचा भाग बनतात. कोळी गीते, समूह गीते, देशभक्तीपर गीते शालेय टप्प्यावर सोबत करतात. भावगीते तरुण वयात रमवतात तर प्रौढ वयात अभंग अंतर्मुख करतात.

प्रसिद्ध गायक तानसेन यांच्या लहानपणीची गोष्ट ! तंना लहानपणी लपायचा आणि प्राण्यांच्या आवाजाने वाटसरूंना घाबरवायचा. स्वामी हरीदास यांनी त्याचे हे केवळ आवाज ऐकून त्याला संगीताची देणगी आहे हे ओळखले. त्याच्या वडिलांनी त्याला हरिदास यांच्या स्वाधीन केले. उत्तम गुरुंकडे संगीताची तपश्चर्या करून तंनुचे ‘तानसेन’ झाले.

संगीत ही अशी साधना आहे कि यात शॉर्टकट चालत नाही. गुरु-शिष्य परंपरा ही मौखिक परंपरा जपणारे शास्त्रीय संगीताचे शिक्षण हा आपला अनमोल ठेवा आहे. पण म्हणून मुलांना गाणं शिकवायचं तर फक्त गाण्याच्या क्लासला अडकवून मागणार नाही यामुळे. कदाचित त्यांना गाण्याबाबत तिरस्कार निर्माण होऊ शकतो. निसर्ग संगीत ऐकवून श्रवण संवेदनांना चालना देणे, त्याचबरोबर अभिनय गाणी, नादमय शब्दांची गाणी, गोष्टी सांगणारी गाणी मुलांना आवडतात. सुरुवात तेथूनच असायला हवी. मग त्यांची उपजत आवड आपल्याला लक्षात यायला लागते.

संगीत ही खरं तर मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे आणि पूर्ण मोफत निशुल्क! ते मानवाला आनंदी करू शकणारे मानसिक आजारांवर चे औषधही आहेच. फक्त ताण आणि नैराश्य नाही तर गंभीर आजारांवरही संगीताचा उपयोग संशोधनाने सिद्ध झाला आहे. संगीतातील रागा वरील संशोधन केंद्र चेन्नईत आहे. तेथे डॉक्टर्स व थेरपिस्टच्या मदतीने रागांवर संशोधन केले जाते. इंसोमनिया, हाय आणि लो बीपी, स्किझोफ्रेनिया आणि आणि एपिलेप्सी सारख्या मानसिक आजारांवर राग उपयोगी ठरतात. हिप्पॉक्रेट्स चा सुद्धा आजारी पेशंट बरे करण्यासाठी संगीत थेरपी वर विश्वास होता. कोणत्या आजाराला कुठल्या प्रकारचे म्युझिक किती काळ ऐकावे लागेल याचे म्युझिक थेरपी ट्रेनिंग घेतलेले असते.

संगीतातील बऱ्याच रागांचा उपयोग कोणत्या आजारांना होऊ शकतो याबाबत चेन्नई रिसर्च सेंटरमध्ये बरेच संशोधन झालेले आहे. त्यांच्या सांगण्यानुसार ‘अहिर भैरव व पुरिया ‘सारखे राग, हायपर टेन्शन साठी तर ‘सहाना आणि सुहा ‘हे राग अँगर कंट्रोल साठी उपयोगी ठरतात. ‘मालकंस ‘आणि’ हिंडोल ‘सारखे राग ताप कमी करण्यासाठी आणि पोटाच्या विकारावर, तर ‘दरबारी कानडा’ आणि ‘सोहनी’ डोकेदुखीला पळवतात. ‘खमाज’ राग ऐकणे, आनंदी राहण्यासाठी, एकूणच चांगल्या तब्येतीसाठी, फिटनेससाठी उपयोगी आहे. फार पुरातन काळापासून आपल्याकडे मेघमल्हार आळवल्याने पाऊस पडतो तर दीप राग गायनाने दिवे लागतात असे संदर्भ आढळतात.

दिव्यांग मुले, मेंदूच्या कुठल्यातरी आजाराने ग्रस्त मुले यांना म्युझिक थेरपी खूप उपयुक्त ठरलेली दिसून येते. थोडक्यात संगीत हे अतिशय ‘पॉवरफुल हीलींग टूल’ आहे. ते माणसाने निर्माण केलेले नाही. तर पूर्वीपासूनच अस्तित्वात असते. डॉक्टर राजन शंकर म्हणतात “आपल्याला फक्त त्या अस्तित्वात असलेल्या संगीत ऊर्जेशी केवळ तादात्म्य पावायचे असते, मग त्याची जादू आपल्याला नक्कीच जाणवते.” आज प्रत्येकाने याचा उपयोग करून घ्यायला हवा आहे आणि यावर अजून संशोधनाची पण गरज आहे.

ही बातमी पण वाचा : गोष्ट एका ‘ती’ची

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER