रुग्णांच्या अपुरी माहितीमुळे मनपाने ठोकले तीन लॅबला सील!

Pune Manpa

पुणे : कोरोनाची चाचणी करणाऱ्या नागरिकांची अपूर्ण माहिती देणाऱ्या तसेच रेकॉर्ड न ठेवणाऱ्या तीन लॅबला महापालिकेने दणका दिला आहे. या चुकांमुळे जवळपास ३० टक्के रुग्णांचा शोध घेण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या तीनही लॅबची कोविड चाचणी यंत्रे सील करण्यात आली, अशी माहिती अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या १ हजारापार झाली आहे. मागील तीन आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या जास्त वाढली आहे. शासकीय तपासणी केंद्रांसह खासगी लॅबमधील केंद्रांवर नागरिकांकडून स्वाब चाचणी केली जात आहे. ही चाचणी करताना संबंधित व्यक्तीचे नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबरसह सर्व अद्ययावत माहिती पालिकेने दिलेल्या नमुन्यामध्ये भरून देणे आवश्यक आहे. शासनाला याचा दैनंदिन अहवाल द्यावा लागतो.

खासगी प्रयोग शाळांनी पालिकेकडे सर्व आवश्यक माहिती वेळेवर पुरविणे आवश्यक आहे. या प्रयोगशाळांकडून माहिती वेळेत दिली जात नाही. यात काही रुग्णांचे मोबाईल नंबरसुद्धा नाहीत, तर काहींचे पत्ते अपूर्ण आहेत. काही रुग्णांच्या पुढे ‘पुणे’ एवढाच उल्लेख करून माहिती देण्यात आलेली आहे. याबाबत, महापालिकेने वारंवार सूचना दिल्या होत्या. लेखी खुलासादेखील मागविण्यात आला होता.

पत्ते अपूर्ण व मोबाईल क्रमांक नसल्याने रुग्णांचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रकार गंभीर झाल्यामुळे लॅब सील करण्यात आल्या आहेत. पुढील आदेशापर्यंत प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या न करण्यास प्रशासनाने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER