मनोज वाजपेयीलाही झाली कोरोनाची लागण

Manoj Vajpayee also corona positive

बॉलिवू़डमधील कलाकारांनी कोरोनापासून वाचण्यासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजना करीत सिनेमाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. कोरोनाची लागण कमी होत असल्याची चिन्हे दिसत असतानात आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक कलाकार, निर्मात्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता दुसऱ्या लाटेतही बॉलिवूडमधील कलाकारांना कोरोनाने ग्रासल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि संजय लीला भंसाळीचा (Sanjay Leela Bhansali) कोरोनाची लागण झाली होती आणि आता मनोज वाजपेयीलाही (Manoj Bajpayee) कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

मनोज वाजपेयी त्याच्या नव्या ‘डिस्पॅच’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होता. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरु होते. रणबीर कपूरही फिल्मसिटीमध्येच शूटिंग करीत होता आणि त्याला कोरोना झाला. आणि आता मनोज वाजपेयीही कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. त्यामुळे या सिनेमाचे शूटिंग महिन्याभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. केवळ मनोजच नव्हे तर सिनेमाचा दिग्दर्शक कानू बहललाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सिनेमाची संबंधित सूत्रांनी दिली. या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच निर्माता रॉनी स्क्रूवालाने सिनेमाचे शूटिंग बंद केले आहे. मनोज आणि कानूवर लागलीच उपचार सुरु करण्यात आले आहेत. या दोघांनाही १५ दिवस होम क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे.

फिल्मसिटीमध्ये कोरोना नियमांचे पालन व्यवस्थित केले जात नाही. कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. तेथे कोणीही कसाही फिरत असतो, अनेक ठिकाणी तर मास्क न घातलेले अनेक जण फिरताना दिसतात. फिल्मसिटीतील कँटीनमध्येही अनेक जण मास्क न घालता वावरत असताना दिसतात. काही कलाकार परदेशातून येतात आणि घरी क्वारंटाईन न होता थेट फिल्मसिटीमध्ये शूटिंगला पोहोचतात. एवढेच नव्हे तर देशातील काही राज्यांमधून मुंबईला येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक असतानाही काही जण खोटे सर्टिफिकेट तयार करतात आणि फिल्मसिटीमध्ये कामाला येतात. त्यामुळेही फिल्मसिटीत कोरोना पसरल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. मुंबईकरांमध्ये कोरोनाची भिती नसल्याने ते कोरोना प्रोटोकॉलचे पालन करीत नाहीत. त्यामुळेच मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे म्हटले जाऊ लागले आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर पुन्हा एकदा फिल्मसिटी बंद करण्याचा विचार सरकारला करावा लागेल यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER