नशेच्या व्यापाराची 50 वर्षांपूर्वीच दिली होती मनोज कुमार यांनी माहिती

Manoj Kumar

सुशांत मृत्यूप्रकरणाने (Sushant death) आता वेगळे वळण घेतले असून आता सर्व फोकस बॉलिवुडमधील नशेच्या व्यवसायावर केंद्रित झाला आहे. सीबीआयने (CBI) रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविकसह आणखी काही जणांना अटक केली आहे. पैसे मिळवण्याचा झटपट मार्ग म्हणजे ड्रग्सचा व्यवसाय. या व्यवसायात अनेकांनी कोट्यावधींची माया मिळवली आहे. गेल्या काही दिवसातील बॉलिवुड आणि ड्रग्सच्या बातम्या पाहताना, वाचताना 1967 मध्ये आलेल्या मनोज कुमार यांच्या उपकार चित्रपटाची आठवण आली. उपकार (Upkar movie) हा देशभक्तीपर चित्रपट होता परंतु त्यात नशेच्या व्यापाराची गोष्टही सांगण्यात आली होती.

बॉलिवुडमध्ये मनोज कुमार (Manoj Kumar) यांच्याप्रमाणे देशभक्तीपर चित्रपट तयार करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढल्याचे दिसत आहे. यात अक्षय कुमार, जॉन अब्राहम, अजय देवगन, विकी कौशल यांचे नाव आघाडीवर आहे. केवळ देशभक्तीच नव्हे तर समाजातील विविध समस्यांवरही हे तिघेही नायक चित्रपटाची निर्मिती करून प्रेक्षकांना त्या समस्यांबाबत अवगत करीत असतात. सरकारच्या विविध योजनांची माहितीही ते चित्रपटाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत असतात. मात्र असे चित्रपट करताना त्यात मनोरंजनाचा, गाण्यांचा तडका द्यायला ते विसरत नाहीत. परंतु सध्याची स्थिती अशी आहे की, या कलाकारांना भाजपचे प्रवक्ते म्हटले जाऊ लागले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येते.

खरे तर कलाकार हे समाजाला जे आवडते किंवा जे त्यांच्यापर्यंत पोहचावे असे त्यांना वाटत असे ते पोहचवण्याचे काम करतात. बरं याची सुरुवात आत्ताच झाली आहे असे नाही. तर स्वातंत्र्यपूर्व काळातही जनतेने इंग्रजांविरुद्ध संघर्ष करण्यास पेटून उठावे यासाठी प्रतिकात्मक कॅरेक्टर दाखवून चित्रपट तयार केले जात. त्यानंतर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांवर जसे चित्रपट तयार झाले तसेच काँग्रेस सरकारचे यश दाखवणारे चित्रपटही वेगवेगळ्या रुपात तयार झाले होते. परंतु तेव्हा कोणीही निर्माते किंवा कलाकारांवर काँग्रेसचे प्रवक्ते असल्याचा आरोप केला नव्हता. मात्र आणिबाणीच्या काळात काही कलाकारांच्या देशभक्तीवर सरकारनेच बोट ठेवले आणि त्यांची गाणी आणि चित्रपट बॅन केले होेते.

देशभक्तीपर चित्रपट तयार करणाऱ्यांच्या यादीत मनोज कुमार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये देशातील जनतेपुढील समस्या मांडतानाच देशभक्तीने भरलेलेही अनेक चित्रपट तयार केले. विशेष म्हणजे त्यांच्यावर कधीही कोणीही कसलाही आरोप केला नाही.

थोडेसे विषयांतर झाले खरे, पण आपला विषय होता 1967 मध्ये आलेला उपकार चित्रपट. या चित्रपटाने मनोज कुमार यांना भारत कुमारची इमेज दिली. आपल्या भावाला शिक्षण मिळावे म्हणून भारत शहरात शिकायला येतो. पण भाऊ शिकण्याऐवजी नशेचा व्यापार करून पैसे कमवण्याचा मार्ग पत्करतो. शेवटी त्याला उपरती होते आणि तो स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करतो. तेव्हाच मनोज कुमार यांनी नशेच्या व्यापाऱ्याची माहिती प्रेक्षकांना दिली होती.लालबहादुर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान घोषणेवर आधारित  या चित्रपटात त्यांनी शेतकऱ्याचे महत्वही जनतेसमोर मांडले होते.

या चित्रपटानंतर त्यांनी पूरब और पश्चिम मध्ये भारतीय सभ्यतेची माहिती दिली तर शोर मध्ये समाजात वाढत असलेल्या ध्वनी प्रदूषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होेते. हा खरोखरच एक उत्कृष्ट चित्रपट आहे. त्यानतंर रोटी, कपड़ा और मकानमध्ये त्यांनी माणसाच्या जीवनाला आवश्यक असलेल्या या तीन गोष्टींची महता सांगत असतानाही महागाईवरही भाष्य केले होते. हा चित्रपट स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गरीबी हटाओ घोषणेवर आधारित होता. मनोज कुमार यांनी नेहमी त्या त्या काऴात पंतप्रधान असलेल्यांच्या घोषणा आणि विचारांवर आधारित मनोरंजक चित्रपट तयार केले होते आणि विशेष म्हणजे ते चित्रपट प्रेक्षकांनाही आवडत असत.

मात्र वर उल्लेख केल्याप्रमाणे आज काही कलाकार जेव्हा देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती करतात तेव्हा त्यांच्यावर मात्र आरोप केले जातात. सध्याच्या राजकारणाने वेगळे रुप घेतले असल्याने त्याचा परिणाम चित्रपट उद्योगातील कलाकार, निर्मात्यांवरही होऊ लागला आहे जे योग्य नाही एवढेच या निमित्ताने म्हणावेसे वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER