मणीराज करंजी…तर शिवानी मालपोआ

Shivani Sonar-Maniraj Pawar

जेव्हा दोन कलाकार मालिका, सिनेमा किंवा नाटकाच्या निमित्ताने एकत्र काम करतात तेव्हा त्यांची ओळख जरी सहकलाकार म्हणून झाली तरी नंतर ते इतके चांगले मित्र होतात. एक छान नातं त्यांच्यामध्ये तयार होतं . यालाच आपण पडद्यावरची केमिस्ट्री असेही म्हणतो. सध्या लोकप्रिय असलेल्या राजा राणीची ग जोडी या मालिकेतील संजीवनी म्हणजे शिवानी सोनार आणि रणजीत म्हणजे मणिराज पवार यांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडते. या दोघांचे पडद्यावरचे नाते तर छान आहेच पण ऑफ स्क्रीन केमिस्ट्री देखील कमाल आहे हे नुकत्याच एका मुलाखतीमधून दिसून आले.

आता दिवाळीचा मोसम तोंडावर आला आहे आणि याच निमित्ताने शिवानी सोनारला एका मुलाखतीत विचारलं की तुला मणीराज हा दिवाळीतल्या कुठल्या पदार्थसारखा आहे असं वाटतं ? यावर छान हसत शिवानीने मणिराज कडे पाहिलं आणि थोडासा विचार करून शिवानी म्हणाली मणीराज मला फराळाच्या ताटातल्या करंजीसारखा वाटतो. आता शिवानीला नुसतं असं म्हणून तर चालणार नव्हतं. करंजी सारखा वाटतो म्हणजे नेमका कसा आहे याचं स्पष्टीकरण शिवानीला द्यावच लागणार होतं. पण शिवानीला देखील खूपच उत्साह आला कारण हा प्रश्नच इतका खुसखुशीत होता की याच्यावरचे उत्तर देखील तितकच खुसखुशीत असणार हे ओघाने आलेच. त्यामुळे शिवानीला जेव्हा अधिक खोलात जाऊन विचारलं तेव्हा शिवानीला देखील खूपच हुरुप आला. ती म्हणाली, करंजीचे दोन भाग असतात. एक म्हणजे आतमध्ये असलेलं गोड सारण आणि दुसरा म्हणजे हे सारणवरती असलेली करंजीची पारी. खरंच मणीचा स्वभाव असाच आहे. त्याला जेव्हा पहिल्यांदा कोणी भेटतं तेव्हा प्रत्येकाला असे वाटते की हा थोडा रुक्ष आहे की काय. करंजीच्यावरची पारी कडक असते. थोडीशी मऊ असते त्यामुळे मणीराजला देखील बघितल्यानंतर असं वाटू शकतं की हा फारसा कोणाशी बोलत नसेल किंवा शांत असेल. पण मणिराज कसा आहे हे मला विचारा. कारण चित्रीकरणाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांसोबत इतका वेळ घालवला की खरंच मणीचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी त्याला कळत नसतील इतक्य त्याचा मला कळायला लागलेत. मणीराज करंजीतील सारणा सारखा स्वभावाने गोड आहे. पण इथे स्पष्ट शब्दात काही सांगायची वेळ येते, एखाद्याला एखाद्याची चूक दाखवण्याची वेळ येते तिथे तो करंजीच्या कडक पारीसारखा होतो.

शिवानीने मणीराजला फराळातल्या करंजीची उपमा दिली त्याने देखील क्षणभर असा विचार केला की हा खरच मी करंजी सारखा आहे आणि यावर शिवानी आणि मणीराज दोघांनी अगदी दिलखुलासपणे हसून घेतलं. आता मुलाखत घेणाऱ्याने पुढचा प्रश्न विचारला तो मणीराजला. तुला शिवानी दिवाळीच्या कोणत्या पदार्थ सारखी वाटते? आता या प्रश्नावर मणिराज काय उत्तर देतो याकडे शिवानीचे लक्ष्य लागलं नसतं तरच नवल. मणीराज म्हणाला, मला वाटलं की शिवानी म्हणजे बेसनाचा लाडू असेल. अगदी खरपूस भाजलेले बेसन, साखर स्वतःमध्ये मिसळवून होणारा गोडवा आणि तुपाची शाही टेस्ट असलेला. त्याने प्रयत्नही केला हे सांगायचा की शिवानी ही बेसन लाडू सारखी आहे. पण शिवानीला मुळात लाडू आवडत नसल्यामुळे तिने त्याला अजून एक पर्याय दिला आणि मग शिवानीला मणीराजने थेट मालपोआची उपमा दिली. खरंच शिवानी ही जसा मालपोआ गोड असतो तशी ती नखशिखांत गोड आहे. स्वभावाने, तिच्या काम करण्याच्या पद्धतीने, एकमेकांना करण्याच्या सहकार्यने, एकमेकांना समजून घेण्याची वृत्तीने. ती खूप गोड आहे जसा मालपोआ असतो. ही मुलाखत राजा राणीची ग जोडी या मालिकेच्या सेटवर झाल्यामुळे या दोघांच्या एकमेकांना एकमेकांकडून दिलेल्या दिवाळीच्या फराळातील पदार्थाच्या उपमानी सेटवरच्या सगळ्यांचेही मनोरंजन झाले .त्यामुळे आता जेव्हा मालिकेच्या शूटिंगसाठी मणिराज आणि शिवानी येतात तेव्हा मणीराज आणि शिवानी आले असं कोणी म्हणत नाही तर करंजी आणि मालपोआ आले असं म्हणतात. तर दिवाळी होईपर्यंत या दोघांना सेटवर याच नावाने हाक मारायची असे सगळ्यानी ठरवलेले आहे. यानिमित्ताने शिवानी आणि मणीराज देखील त्यांना मिळालेल्या नवीन नावांची मजा घेत आहेत.

खरं तर सध्या राजा राणीची गं जोडी या मालिकेत खूप गंभीर वळण आले आहे. संजीवनी हीचे वय अठरा वर्षाच्या आत असल्याचं सत्य उघड झाल्यामुळे मालिकेतील फौजदार रणजीत खचून गेला आहे . आई साहेबांचे, बेबीमावशीचे मन जिंकलेल्या संजीवनीला आता कुणी डोळ्यासमोर देखील उभं करून घेईना असं झालंय. त्यामुळे संजीवनी देखील कोलमडून गेली आहे. आणि मालिकेत ऑन स्क्रीन अशा पद्धतीचं गंभीर वातावरण असताना मणिराज आणि शिवानीने एकमेकांना करंजी मालपोआ ची उपमा दिल्यामुळे छान खरपूस आणि खुसखुशीत वातावरण सेटवर निर्माण झाले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER