फळांचा राजा आंबा – सर्वांग औषधोपयोगी !

Mango

उन्हाळा सुरु झाला की सर्वजण आंब्यांची वाट पाहतात. कैरी असो वा आंबा त्याचे अनेक पदार्थ करण्यास या मौसमात सुरु होतात. आंब्याचे अनेक प्रकार या मौसमात चाखायला मिळतात. पायरी हापूस केसर प्रकार कोणताही असो आंबा तो आंबाच, प्रत्येकाची चव न्यारीच !

आंब्याचे गुण देखील भरपूर आहेत. या वृक्षाचे प्रत्येक अंग औषधी गुणाचे आहे. पक्व फळ म्हणजेच पिकलेला आंबा हा वातपित्तशामक असतो तर कच्चा आंबा म्हणजेच कैरी ही अम्ल रसाची त्रिदोष प्रकोपक असते.

कैरी रुचिकारक, भूक वाढविणारी पण पित्त वाढविणारी असते. परंतु याचे पन्हे मात्र दाहशामक तहान शमन करणारे व थकवा घालविणारे असते. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी रोज घेऊ नये.

  • आंब्याची कोवळी पाने रस करून घेतल्यास मळमळ वांती यावर उपयोगी पडतात.
  • आंब्याची फुले अतिसार थांबविणारी आहेत.
  • आंब्याच्या वृक्षाची साल ही कषाय म्हणजे तुरट रसाची असते. साल उत्तम व्रणरोपक म्हणजे व्रण जखम भरून आणणारी असते. गर्भाशयावर आलेली सूज कमी करते. स्त्रियांना पांढरे पाणी जात असेल तर सालीच्या काढ्याने योनीधावन केल्यास योनी दुर्गंध तसेच श्वेतस्त्राव कमी होतो.
  • बीजमज्जा म्हणजेच कोयीच्या आतला गर हा कृमीनाशक आहे. तसेच अतिसारनाशक आहे. वारंवार मूत्र प्रवृत्ती होत असल्यास बीजमज्जा त्यावर उपयोगी ठरते.

सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात जास्त वापरण्यात येणारे प्रयुक्तांग म्हणजे पिकलेला आंबा! हा हृद्य म्हणजेच हृदयाला हितकर, मलबद्धता दूर करणारा, पौष्टिक, ताकद देणारा, वृष्य आहे. वर्ण चांगला करणारा आहे. वातशामक, पित्तशामक सर्वांना सुख देणारा असतो. आंबा सर्वांचा आवडता पण अति खाण्याने अजीर्ण होऊ शकते. आंब्याला नेसर्गिकरित्या पिकविलेले असल्यास उत्तम. आंब्यांच्या देठाजवळील द्रव कधी कधी घश्यात खवखव, चेहऱ्यावर पुरळं फोड अशी लक्षणे निर्माण करू शकतो त्यामुळे तो बराच वेळ पाण्यात ठेवून स्वच्छ करून वापरावा. असा हा फळांचा राजा उन्हाळ्याच्या काही महिन्यात मिळणारा त्यामुळे त्याचा आस्वाद नक्की घ्यावा.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button